हरी नरके : पुस्तक भिशी योजनेचा शुभारंभपुणे : प्राचीन ग्रंथसंपदा महाराष्ट्रात पहायला मिळते. कथासाहित्याचे जागतिक दालन महाराष्ट्रात आहे. त्यामुळे इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्र ग्रंथालयांच्या बाबत श्रीमंत आहे. म्हणूनच महाराष्ट्राला ग्रंथालयांचे माहेरघर म्हटले पाहिजे, असे मत ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांनी व्यक्त केले. विधायक, पुणे आणि त्वष्टा कासार वाचन मंदिर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पुस्तक दिनानिमित्त गणेशोत्सव कार्यकर्त्यांसाठी पुस्तक भिशी योजना रविवारी सुरू करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. अक्षरधारा बुक गॅलरी येथे झालेल्या कार्यक्रमात त्वष्टा कासार वाचन मंदिराचे अजित पिंपळे, दिलीप राऊत, दत्ता सागरे, सुरेश पवार, अॅड. शिरीष शिंदे, राजू पाटसकर, उमेश सकपाळ, भोला वांजळे, अशोक चिंबळकर आदी उपस्थित होते. नरके म्हणाले, वाचकांनी पुस्तकांना कडकडून भेटणे, त्यांच्या समवेत जगणे म्हणजेच वाचनसंस्कृती. ज्या घरात माणसे आणि पुस्तके राहतात, तेच खऱ्या अर्थाने घर असते. मुलांवर संस्कार करण्यासाठी पुस्तके आवश्यक आहेत. गिरीश पोटफोडे यांनी सूत्रसंचालन केले. आनंद सराफ यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)सुसंवाद वाढणार४पुण्यातील सुमारे ३० गणेशोत्सव मंडळ आणि ५ स्वयंसेवी संस्था यामध्ये सहभागी झाल्या आहेत. दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी योजनेतील सभासद एकत्र जमणार असून आपण वाचलेल्या पुस्तकांविषयीची माहिती इतरांना सांगणार आहे. यामुळे गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुसंवाद वाढविण्यास मदत होणार आहे, असे पिंपळे यांनी सांगितले.
महाराष्ट्र हे ग्रंथालयांचे माहेरघर
By admin | Published: April 29, 2015 1:23 AM