- नितीन चौधरी
पुणे : दोन वर्षांपूर्वी पेरूचे उत्पादन सुरू झाले. मुंबई, पुण्यासारख्या शहरांत माल पाठवायचो. त्याला वाहतूक खर्च लागायचा. सरासरी दर किलोला ३० रुपयांपर्यंत मिळायचा. त्यातून खर्च वजा जाता एकरी दोन लाख रुपये मिळायचे. आता शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत पेरू विकतो. प्रतिकिलो दर १० रुपये जादा मिळतात. त्यातून एकरी दीड लाख रुपये अधिकचे उत्पन्न मिळते. शिरूर तालुक्यातील पिंपळसुट्टीचे शेतकरी ऋषिकेश शितोळे यांचा हा अनुभव. राज्यात जे पिकते त्याला बाहेरील राज्यात चांगला दर मिळतो हे आता शेतकऱ्यांना चांगलेच उमगले आहे.
राज्यात शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झाल्या असून, त्यामार्फत शेतमालाला चांगला दर मिळत आहे. यातीलच एक शिरूर येथील आदर्श ॲग्री फार्मर प्रोड्यूसर कंपनी. पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यातील सुमारे ५०० शेतकरी सभासद असलेली ही कंपनी पेरूचे तामिळनाडू, केरळ व दिल्लीच्या बाजारपेठेत विक्री करते. छत्तीसगडमध्ये वाढलेल्या तैवान पिंक व व्हीएनआर या दोन जाती सध्या राज्यातील शेतकऱ्यांनी लागवडीखाली आणल्या आहेत. या गटातील ८५ शेतकऱ्यांनी या दोन जातींची लागवड केली असून, तैवान पिंक जातीचे १५० एकर, तर व्हीएनआर जातीचे ५० क्षेत्र आहे. या दोन्ही जातींच्या पेरू गोडीला कमी आहेत. त्यामुळे त्याची विक्री राज्यात अपेक्षेनुसार होत नाही. त्यामुळे या तिन्ही राज्यांत त्याची विक्री केली जाते. येथे सध्या ५० रुपये प्रतिकिलो असा दर मिळत आहे. राज्यात हाच दर केवळ ३२ ते ३५ रुपये किलो इतका आहे. त्यामुळे खर्च वजा जाता शेतकऱ्यांना प्रतिकिलो किमान १५ रुपये जादा दर मिळत आहे. त्यामुळे एकरी दीड ते दोन लाखांचा नफा मिळत आहे.
खात्रीशीर विक्री
याबाबत कंपनीचे प्रमुख विकास नागवडे म्हणाले, ‘सुरुवातीला चेन्नईला स्ट्रॉबेरी पाठवली होती. मात्र, व्यापाऱ्याने १०० रुपये किलो दर सांगून हातात केवळ ७० रुपये दिले हा अनुभव गाठीशी होता. महाराष्ट्रात पेरूचे क्षेत्र वाढत आहे. मात्र, मागणी नाही. त्यासाठी चेन्नई, दिल्ली बाजारपेठांचा अभ्यास केला. तेथील मागणीनुसार पेरू पाठविण्यास सुरुवात केली. तेथे बिजाक या स्टार्टअप कंपनीने विक्रीसाठी मदत केली. त्यासाठी ते एक टक्का कमिशन घेतात. मात्र, पैशांची हमी घेतली. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत नाही. तामिळनाडू व केरळमध्ये वर्षभर माल पाठविता येतो. दिल्ली बाजारपेठेत सहा महिने माल जातो. तेथे उत्तर प्रदेश, छत्तीसगडच्या मालाची स्पर्धा असते.’
किसान रेलचा फायदा
हा माल सांगोल्याहून किसान रेलमार्फत पाठविला जातो. शेतकरी थेट पाठवित असल्याने किलोमागे दीड रुपये भाडे कमी लागते. कमी वेळेत माल बाजारात पोहोचल्याने चांगला दर मिळतो. सध्या कंपनीमार्फत तामिळनाडूतील कोईमतूर व केरळमधील पल्लकड येथे कांदा पाठविला जात आहे. त्याला चांगला दर मिळत आहे.