पुणे: महारेरा नोंदणी क्रमांक आणि क्यूआर कोडशिवाय छापल्या जाणाऱ्या जाहिरातींवर महारेराने गेल्या वर्षापासून कारवाई सुरू केलेली आहे. त्यासाठी आतापर्यंत अनेक प्रकल्पांवर दंडात्मक कारवाईही केली आहे. मात्र, अशा जाहिराती शोधण्यासाठी आता महारेराने कृत्रिम प्रज्ञेचा अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आधार घेतला जाणार आहे. त्यासाठी जाहिरात क्षेत्रातील अॅडव्हर्टायझींग स्टँडर्ड कौन्सिल ऑफ इंडिया या संस्थेसोबत करार करण्यात आला आहे.
स्थावर संपदा कायद्यानुसार ५०० चौरस मीटरपेक्षा जास्त किंवा ८ सदनिकांचा किंवा प्लाॅटचा कुठलाही प्रकल्प असल्यास त्याची महारेराकडे नोंदणी असणे अत्यंत आवश्यक आहे. महारेरा नोंदणीक्रमांक असल्याशिवाय कुठल्याही विकासकाला प्रकल्पाची कुठल्याही प्रकारची जाहिरात, त्या प्रकल्पातील घरांची नोंदणी, विक्री करता येत नाही. कुठल्याही गृहनिर्माण प्रकल्पांत गुंतवणूक करण्यापूर्वी, आपली गुंतवणूक सुरक्षित आणि संरक्षित राहावी, यासाठी महारेरा नोंदणी क्रमांक आणि सोबतच क्यूआर कोडही पाहणे गरजेचे आहे. म्हणून महारेराने याबाबत स्वाधिकारे कारवाई सुरू केली आहे.
मात्र, पारंपरिक माध्यमांशिवाय दिवसेंदिवस जाहिरातींची नवनवीन माध्यमे विकसित होत आहेत. या कारवाईत अधिक व्यापकता यावी. कुठल्याही माध्यमातून प्रसिद्ध होणाऱ्या अशा जाहिरातींना आळा बसण्यासाठी महारेराने या क्षेत्रातील तज्ज्ञ संस्थेची मदत घेण्याचे ठरवले. त्यानुसार या क्षेत्रातील अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड कौन्सिल ऑफ इंडिया या स्वयंविनियामक संस्थेशीच महारेराने नुकताच सामंजस्य करार केला आहे. ही संस्था वर्तमानपत्रे, वाहिन्या, फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स (ट्विटर), संकेतस्थळ अशा विविध ऑनलाइन माध्यमातूनही प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींचे संनियंत्रण करते. शिवाय महारेरा नोंदणीक्रमांक आणि क्यूआर कोडशिवाय छापल्या जाणाऱ्या जाहिरातींच्या शोधासाठी ते कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानाचीही मदत घेणार आहेत. या करारानुसार सर्व माध्यमांतून प्रसिद्ध होणाऱ्या अशा प्रकारच्या जाहिराती नियमितपणे ते महारेराच्या निदर्शनास आणून देतील. त्यासाठी अशा प्रकारच्या जाहिरातींचा शोध, त्याचे संनियंत्रण आणि मूल्यमापन करण्यासाठी स्वतंत्र गटाची निर्मिती करतील. या करारावर महारेराचे प्रशासकीय अधिकारी वसंत वाणी आणि संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा कपूर
कुठल्याही माध्यमातून अशा चुकीच्या जाहिराती छापल्या जाऊ नये यासाठी महारेराने या क्षेत्रातील तज्ज्ञ आणि स्वयंविनियामक संस्थेची मदत घेतलेली आहे. यामुळे अशा चुकीच्या जाहिरातींना पायबंद घालायला नक्कीच मदत होईल, असा विश्वास आहे. - अजोय मेहता, अध्यक्ष, महारेरा