पुणे : पितृपक्षाच्या समाप्तीनंतर गुरुवारपासून (दि. ३) आदिशक्तीचा जागर करणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ होणार आहे. आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध नवमी या काळात देवीची उपासना केली जाते. नवरात्रोत्सवासाठी शहरातील सर्व देवींची मंदिरे सज्ज झाली असून, पुण्यासह उपनगरांतील मंदिरांमध्ये गुरुवारी पहाटेच पारंपरिक पद्धतीने घटस्थापना होणार आहेत. त्यानंतर मंदिरे दिवसभर भाविकांसाठी खुली राहणार आहेत.
शारदीय नवरात्रच्या आदल्या दिवशी मध्यवर्ती पुण्यासह उपनगरांतील देवीची मंदिरे व परिसराची रंगरंगोटी, विद्युत रोषणाईची कामे सुरू होती. घरोघरी नवरात्र बसत असल्याने घराची स्वच्छता, देवीच्या पूजेचे साहित्य आणि सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरा करणाऱ्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन सुरू होते. घरांमध्ये घटस्थापनेची पूजा झाल्यानंतर भाविक पहिल्या दिवसापासूनच दर्शनासाठी मंदिरांमध्ये जातात. त्यामुळे मंदिर प्रशासनांनी गर्दीच्या व्यवस्थापनासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. काही मंदिर व्यवस्थापकांनी सामाजिक उपक्रमांसह भाविकांचा विमा उतरवला असून, सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्हींच्या वापरावरही भर दिला आहे. शहरामध्ये शारदीय नवरात्रोत्सवाची लगबग असताना बंगाली बांधवांच्या ‘बंगिया संस्कृती संसद’ संस्थेनेही दुर्गापूजा, खाद्यजत्रा, बंगाली संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या महोत्सवाचे आयोजन केले आहे.
ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी मंदिरामध्ये गुरुवारी पहाटे सहा वाजता घटस्थापना होणार आहे. घटस्थापनेनंतर भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर रात्री साडेबारापर्यंत खुले राहणार आहे. उत्सवादरम्यान दररोज देवी विविध रूपांमध्ये आणि वेगवेगळ्या वाहनांवर आरूढ झालेली पाहता येणार आहे. शुक्रवार पेठेतील पिवळी जोगेश्वरी मंदिर आणि काळी जोगेश्वरी मंदिरामध्ये सकाळी विधीवत घटस्थापना होणार आहे. सातारा रस्त्यावरील पद्मावती देवस्थान, तळजाई माता देवस्थान, कर्वेनगर येथील वनदेवी आणि उपनगरांमधील देवीच्या मंदिरांमध्ये सकाळच्या पहिल्या टप्प्यातच घटस्थापना होणार आहे.
भवानी पेठेतील श्री भवानी देवी मंदिरामध्ये गुरूवारी पहाटे सहा वाजता महारुद्राभिषेक महापूजा, तुकाराम महादेव दैठणकर यांचे सनईवादन होऊन सकाळी दहा वाजता घटस्थापना होणार आहे. नऊ दिवस दररोज सकाळी सहस्रनाम आणि श्रीसूक्त पठण होणार आहे. रात्री अकरा ते पहाटे पाच या वेळेत मंदिर बंद राहणार आहे. सारसबागेसमोरील श्रीमहालक्ष्मी मंदिर येथे सकाळी आठ वाजता पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे. तसेच, सायंकाळी सहा वाजता मंदिरावरील विद्युत रोषणाईचे उद्घाटन सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या हस्ते होईल. धार्मिक उपक्रमांबरोबरच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार, कन्यापूजन, विविध शाळांतील शिक्षकांद्वारे भोंडला, वीरमाता-वीरपत्नी सन्मान हे कार्यक्रम होणार आहेत. सांस्कृतिक उपक्रमांमध्ये शिव-पार्वती विवाह सोहळा, कथकली नृत्य, छत्रपती शिवाजी महाराजांवरील नाटय व पोवाडा, सामुहिक गरबा आणि प्रतिकात्मक रावण दहन कार्यक्रम होणार आहेत.
चतृ:शृंगी देवीचे मंदिर २४ तास खुले राहणार
चतृ:शृंगी देवीचे मंदिर नवरात्र उत्सवामध्ये भाविकांसाठी २४ तास खुले राहणार आहे. मंदिराचे व्यवस्थापक देवेंद्र अनगळ यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता घटस्थापना आणि नवचंडी होम होणार आहे. मंदिरात दररोज सकाळी दहा आणि रात्री नऊ वाजता महाआरती करण्यात येईल. दिवसभर सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम सुरू राहणार आहे. उत्सवादरन्यान निवारा वृद्धाश्रमातील आजींसाठीही विशेष भोंडलाही आयोजित केला आहे.