पहाटे महादेवाचा अभिषेक धामणीचे सरपंच सागर जाधव व अरुण बोऱ्हाडे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर मंदिराचे प्रवेशद्वार भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले. कोरोनाच्या संसर्गामुळे दरवर्षी होणारे कीर्तनाचे कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. महादेव मंदिराच्या जीर्णोध्दाराचे काम सत्तर टक्क्याहून अधिक पूर्ण झालेले असून उर्वरित कामाला लवकरच सुरुवात करुन मंदिरात नवीन महादेवाची पिंड, नंदी, कासव यांच्या मूर्तीची लवकरच प्रतिष्ठापना व शिखराचे कलशारोहण करण्यात येणार असल्याचे महादेव मंदिर जीर्णोध्दार समितीने यावेळी जाहीर केले. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना केळीचा प्रसाद वाटण्यात आला. दुपारी अमोल गवंडी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र आळंदी येथील बाल वारकऱ्यांच्या भजनाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचे नियोजन सीताराम जाधव, गणपत भांडारकर, संदीप आळेकर, बाबाजी गाढवे, दीपक जाधव, सतीश पंचरास, अरुण बोर्हाडे, दिनकर दिवेकर, सतीश तांबे यांनी केले. धामणीच्या संगमावरील महादेव मंदिराचा अभिषेक उत्तमराव सावळेराम जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. पूजेचे पौरोहित्य दत्ता बेरीगुरुजी यांनी केले. खंडोबा मंदिराच्या आवारातील महादेवाची पूजा राजेश भगत,नामदेव भगत, राहूल भगत, सुभाष तांबे या भगत मंडळीच्या हस्ते करण्यात आली. पहाडदरा येथील वाघदऱ्यातील महादेव मंदिरात सकाळी अभिषेक पूजा करण्यात आली, अशी माहिती पहाडदऱ्याचे माजी सरपंच मच्छिंद्र वाघ यांनी दिली.
धामणी येथे महादेव मंदिरात महाशिवरात्री साधेपणाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 4:17 AM