भुलेश्वर ; संपुर्ण राज्यात जागृत देवस्थान म्हणुण नावारुपाला आलेल्या पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागातील माळशिरस येथील श्री क्षेत्र भुलेश्वर देवस्थान येथील महाशिवरात्रीची यात्रा कोरोना पार्श्वभुमीवर रद्द करण्यात आल्याची माहीती पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी दिली.
श्री क्षेत्र भुलेश्वर देवस्थान येथे महाशिवरात्री नियोजनासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्या बोलत होत्या. श्री क्षेत्र भुलेश्वर देवस्थान येथे दरवर्षी असंख्य भाविक महाशिवरात्रीला गर्दी करतात. ही गर्दी कमी करण्यासाठी महाशिवरात्री आधीच पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. वन विभागातील दोन्ही दरवाजे बंद ठेवण्यात येणार आहे. पहाटे मंदिरात पुजारी व देवाचे मानकरी यांच्या हस्ते पुजा व महाआरती करण्यात येणार आहे. पाच व्यक्ती पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येणार नाही. यात्रा काळात कोरोना नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे. भुलेश्वर घाटातील मारुती मंदिरापासुन अनेक भाविक मंदिराकडे येतात त्यांचीही वाट अडवण्यात येणार आहे.
यावेळी जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील महाडीक, माळशिरस गावचे सरपंच महादेव बोरावके, माजी उपसरपंच माऊली यादव, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र गद्रे, रूपाली गुरव, माजी तंटामुक्ती उपाध्यक्ष बाळकृष्ण गायकवाड, नवनाथ यादव, उध्दव महाराज यादव, ग्रामसेविका सोनाली पवार, मंडल अधिकारी भारत भिसे, गाव कामगार तलाठी सतीश काशीद, पोलिस पाटील पुजा यादव, पुरातत्व विभागाचे साईनाथ जंगले व भुलेश्वर देवस्थानचे सर्व पुजारी, मानकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
माळशिरसचे सरपंच महादेव बोरावके म्हणाले, कोरोना रोगाच्या पार्श्वभुमीवर यंदा महाशिवरात्री यात्रा रद्द करण्यात आले आहे. कोणीही या ठिकाणी येऊ नये. देवस्थान व ग्रामस्थ यांना सहकार्य करुन फक्त धार्मिक विधी करण्यात येणार आहेत.
फोटो ओळ : श्री क्षेत्र भुलेश्वर देवस्थान येथे महाशिवरात्री नियोजन बैठक घेण्यात आली.