पुणे : साहित्यापेक्षा चित्रपट हे माझे अधिक आवडीचे क्षेत्र आहे. चित्रपट हा अनेक कलांना एकत्र करणारी जागा आहे. मी स्वत:ला गांधीवादी समजतो. आजही गांधींवर प्रेम करणारे जगभरातील लोक पाहून हा माणूस केवढा मोठा असेल हे समजते. महात्मा गांधी ही मोठी परिसंस्था होती, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डाॅ. भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केले.
आशय फिल्म व सांस्कृतिक क्लब आणि विजय जाधव प्रतिष्ठान यांच्यातर्फे आयाेजित प्रकाश मगदूम लिखित ‘द महात्मा ऑन सेल्युलॉईड’ पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बाेलत हाेते. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, अभिनेते व लेखक गिरीश कुलकर्णी, कला अभ्यासक व समीक्षक अभिजीत रणदिवे यांची विशेष उपस्थिती होती.
नेमाडे म्हणाले की, चित्रपटात महात्मा गांधींची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराला शोधणे म्हणजे दिग्दर्शकासाठी मोठे दिव्य असते. अफाट दिव्य शक्तीशिवाय महात्मा गांधींसारख्या व्यक्तिमत्त्वावर चित्रपट काढणे शक्य होणार नाही. व्यास ऋषींनी ज्याप्रमाणे महाभारतात द्रौपदीच्या वस्त्रहरणावेळी सगळे महाभारत एकाच दृश्यात बसवले तसा गांधींवर एक चित्रपट येणे गरजेचे आहे.
गिरीश कुलकर्णी म्हणाले की, आजच्या काळात गांधींबद्दल इतक्या रसाळपणे लिहिले जाणे फार महत्त्वाचे आहे. अनेक अर्थांनी खिळवून ठेवणारे हे पुस्तक आहे. उत्कृष्ट कथाशैली आहे. प्रास्ताविक आशय फिल्म व सांस्कृतिक क्लबचे सचिव सतीश जकातदार यांनी केले.
महात्मा गांधी आणि सिनेमा यांचे तपशीलवार नाते उलगडणारे हे पुस्तक आहे. गांधींना चित्रपट कधी आवडला नाही, पण चित्रपटाने गांधींना कधी सोडले नाही. त्यांची मूल्ये समाजाला नाही तर जगाला तारणारी आहेत, त्यामुळे महात्मा गांधी कधीही विस्मृतीत जाणार नाहीत. विद्यार्थ्यांना, अभ्यासकांना आणि सिनेरसिकांसाठी हे पुस्तक अत्यंत मोलाचे आहे.
- दिलीप प्रभावळकर, ज्येष्ठ अभिनेते