पुणे : कोरोनाचा वाढता फैलावाच्या काळात पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात अचानक बदली करण्यात आली. त्यानंतर गेले काही ४ ते ५ दिवसांपासून हे पद रिक्त आहे. पुण्याची जबाबदारी कुणाच्या हाती द्यायची यावरून महाविकास आघाडीत बरीच खलबतें सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षाकडून जिल्हाधिकारी पदासाठी काही प्रमुख नवे चर्चेत आहे. त्यात पुणे हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र, गेल्या काही वर्षात या बालेकिल्ल्यात भाजपने जोरदार मुसंडी मारत राष्ट्रवादीला शह दिला आहे. आता राज्यात सत्तांतर झाले आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ आणि पुण्याचे पालकमंत्री पद स्वतःकडे घेतले. पुन्हा एकदा एकदा पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी अजितदादा आक्रमक झाले आहे.
खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील पुणे दौऱ्यात अजित दादांचे पुण्याकडे लक्ष असल्याचे सांगितले होते. परंतु, आता पुण्याच्या जिल्हाधिकारी पदावरून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरु असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच पुण्याच्या जिल्हाधिकारी पदासाठी कुणा एका नावावर शिक्कामोर्तब होत नसल्याने हे पद अजूनही रिक्त आहे.
पुण्याच्या जिल्हाधिकारी पदासाठी विविध नवे आघाडीवर आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसने राजेश देशमुख यांचे नाव उचलून धरताना शिवसेनेकडून जी श्रीकांत यांच्या नावाचा आग्रह करण्यात येत आहे. तसेच महाविकास आघडीतील तिसरा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसकडून डॉ. योगेश म्हसे यांचे नाव पुढे केले असल्याची चर्चा आहे. नवल किशोर राम यांच्या जागेवर नवीन नियुक्तीसाठी राजकीय पक्षांमध्ये पडद्यामागे अनेक नाट्यमय घडामोडी घडत असल्याचे बोलले जात आहे. त्यात अजित पवारांसह प्रत्येक पक्ष आपल्या मर्जीतील अधिकाऱ्याच्या नियुक्तीसाठी प्रयत्न करताना दिसत आहे. सध्या तरी पुणे जिल्हाधिकारी पदाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडणार हा प्रश अजूनतरी अधांतरी आहे.
राज्यात एकीकडे वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरु असताना अजित दादांसारखे झटपट निर्णय घेण्यात हातखंडा असलेल्या नेत्याच्या अखत्यारीतील पुण्याबाबत मात्र निर्णय घेण्यात राज्य दरबारी दिरंगाई का होत आहे याबाबद्दल अनेक तर्क वितर्कांना उधाण आले आहे. या घडीला पुणे जिल्हयाचा प्रभारी कार्यभार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या हाती सोपविण्यात आला आहे.आगामी काळात पुण्याच्या जिल्हाधिकारी पदाच्या नियुक्तीसाठी नेमके कुणाचे पारडे वरचढ ठरले हे स्पष्ट होईलच. परंतु सध्या पुण्यात कोरोनाने थैमान घातले असताना जिल्हाधिकारी पदासारखे प्रमुख पद जास्त काळ रिक्त ठेवणे नक्कीच योग्य ठरणार नाही. पण राजकीय समीकरणे बाजूला ठेवून कोरोना परिस्थितीला सक्षमपणे हाताळणाऱ्या अधिकाऱ्याची आजमितीला पुणे जिल्ह्याला अधिक गरज आहे.