पुणे : महाविकास आघाडी सरकाने कोरोना काळात केलेल्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. त्याचप्रमाणे राज्यातील शेतक-यांपासून ते सर्व सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न गेल्या दोन वर्षात राज्य शासनाने केला. मात्र, भारतीय जनता पक्षाने व केंद्र शासनाने राज्य शासनाला सातत्याने अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता अंकुश काकडे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला.
महाविकास आघाडीच्या द्विशतपूर्तीनिमित्त राज्य शासनाने केलेल्या कामाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत काकडे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेनेचे प्रवक्त श्याम देशपांडे, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रतिनिधी व प्रवक्ता प्रदीप देशमुख उपस्थित होते.
केंद्रातील भाजप सरकारने व राज्यातील विरोधी पक्षाने महाविकास आघाडी सरकारला नेहमीच अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. कोरोना काळातही विरोधकांनी राजकारणच केले. मात्र, त्यातूनही मार्ग काढत महाविकास आघाडी सरकारने राज्यात विविध विकास कामे केली,असेही काकडे म्हणाले.
प्रशांत जगताप म्हणाले, कोरोनामुळे राज्याच्या तिजोरीवर ताण आला होता. त्यामुळे स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसह एसटी कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळ द्यावा लागला. परंतु, एसटी कामगारांचे आंदोलन भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनीच ताणले. परिणामी काही कामकागारांनी आत्महत्या केली. त्यास भाजपचे नेतेच जबाबदार आहेत, असाही आरोप जगताप यांनी केला.