बारामती: महाविकास आघाडी सरकारच्या निष्काळजीपणामुळे मराठा आरक्षण आणि ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याचा आरोप करीत भाजपच्या वतीने बारामतीत चक्काजाम आंदोलन करण्यात आले. शहरातील तीनहत्ती चौकात भाजप पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येत महाविकास आघाडी सरकारविरोधी घोषणा दिल्या.
भाजपच्या वतीने मार्ग अडवण्यात आला. या वेळी ओबीसीचे राजकीय आरक्षण आणि मराठा आरक्षणाचा विषय महाविकासआघाडी सरकारने व्यवस्थित हाताळला नाही, त्यामुळे सरकारच्या निषेधार्थ शनिवारी (दि. २६) चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
बारामती शहरातील भाजप कार्यालयापासून हलगी नाद करत कार्यकर्ते तीनहत्ती चौकात पोहोचले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत रस्त्यावर ठिय्या मांडला. मराठा समाजाच्या आरक्षणासह ओबीसीचे रद्द झालेले राजकीय आरक्षण ठाकरे सरकारला आलेले अपयश असल्याचा आरोप भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने करण्यात आला.
या वेळी तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे,जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे आदी पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. मागील दीड वर्षातील महापूर, शेतकऱ्यांना मदतीची केलेली घोषणा, कोरोना महामारी या सर्वांत अपयश आले आहे. हे वसुलीसरकार असल्याची टीका यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी केली.
यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब गावडे, जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे, तालुका अध्यक्ष पांडुरंग कचरे,जिल्हा कार्यकारिणी सदस्य गोविंद देवकाते, शहर अध्यक्ष सतीश फाळके,अॅड.माऊली माने,अॅड. नितीन भामे,युवराज तावरे, अॅड.जी. के. देशपांडे,सचिन मलगुंंडे,प्रमोद तावरे, शहाजी कदम आदी कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलनात सहभाग घेतला.
बारामती शहरात भाजप कार्यकर्त्यांंच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
२६०६२०२१ बारामती—२०