पुणे: महाविकास आघाडीचेपुणे, बारामती व शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार गुरुवारी (दि. १८) एकत्रितपणे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयापासून थोडे दूरवर प्रचाराची पहिली जाहीर सभाही त्याच दिवशी होणार आहे.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि उद्धव सेनेचे संजय राऊत, आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अभिजित फाकटे प्रमुख वक्ते असणार आहेत. पुणे लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार, आमदार रवींद्र धंगेकर, बारामती लोकसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) सुप्रिया सुळे व शिरूर लोकसभेचे डॉ. अमोल कोल्हे हे तीनही उमेदवार गुरुवारी सकाळी १० वाजता आपले उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करणार आहेत, अशी माहिती धंगेकर यांचे प्रचारप्रमुख माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली. त्यानंतर प्रचाराची पहिली जाहीर सभा होईल.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील पुण्यात होणारी ही पहिलीच मोठी जाहीर सभा आहे. जिल्हाधिकारी कार्यालयापासून थोडे दूरवर एका मोकळ्या जागेत या सभेची तयारी करण्यात येत आहे. सभा बरोबर ११ वाजता सुरू होणार आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष तसेच ३५ सहकारी संस्था, संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकारी यात सहभागी होणार आहेत. यानिमित्ताने महाविकास आघाडी जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक प्रचाराचे बिगुल फुंकणार आहे.
मावळ मतदारसंघात आघाडीकडून शिवसेनेचे संजोग वाघेरे उमेदवार आहेत. या मतदारसंघाचे निवडणूक कार्यालय निगडी प्राधिकरणात आहे. त्यामुळे या मतदारसंघातील उमेदवारी अर्ज त्याच कार्यालयात दाखल होतील.