पाषाण : पुणे महानगरपालिकेत महाविकास आघाडीची सत्ता आली पाहिजे. यासाठी महाविकास आघाडी म्हणून तयारीला लागले पाहिजे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता हातात आली आहे. ती परत सोडण्यासाठी नाही. राज्यात ग्रामपंचायत, जिल्हा परिषद ,महापालिका स्थानिक सत्ता केंद्रे महा विकास आघाडीकडेच राहिली पाहिजेत. यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
क्रीडानगरी म्हाळुंगे ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आलेल्या विविध उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, सरपंच मयुर भांडे नगरसेवक बाबुराव चांदेरे, नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका ज्योती कळमकर आदी उपस्थित होते.
खासदार संजय राऊत म्हणाले, महाविकास आघाडीचा झेंडा पालिकेवर फडकवण्यासाठी तयारीला लागले पाहिजे. निवडून आल्यानंतर पक्ष विसरला पाहिजे. परंतु दुर्दैवाने देशात देशपातळीवर असे होताना दिसत नाही. महाराष्ट्रात असे होत नाही. म्हाळूंगे गावातील टीपी स्किमबाबत आम्ही देखील पाठपुरावा करू व हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू असे राऊत यांनी सांगितले. यावेळी कार्यक्रमाला महापौर उपस्थित नसल्यामुळे खासदार संजय राऊत यांनी महापौर शहराच्या असतात ते का आले नाहीत असा उल्लेख करत महापौरांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाजलेल्या मी पुन्हा येईन हे वाक्य खासदार संजय राऊत यांनी मी पुन्हा येईन म्हटल्यानंतर सभागृहामध्ये "हशा" निर्माण झाला. यानंतर खासदार राऊत म्हणाले मी पुन्हा येईल गाव पालिकेमध्ये समाविष्ट झाले आहे यामुळे पालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मी पुन्हा येईल.
नगरसेवक बाबुराव चांदेरे व खासदार संजय राऊत यांनी महापौर उपस्थित नसल्याबाबत भाषणांमध्ये चर्चा केल्यानंतर महापौर वेळेत येणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. नगरसेवक अमोल बालवडकर यांनी काही काळ भाषण मधून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. अखेर अखेर संजय राऊत कार्यक्रम स्थळावरून निघण्या अगोदर महापौर कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित झाले. व स्थानिक पातळीवर रंगलेला राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा या चर्चेतील सामना निकाली निघाला.