महाविकास आघाडी सरकारमध्ये बेबंदशाही सुरू; चंद्रकांत पाटलांची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 11:32 AM2021-03-12T11:32:23+5:302021-03-12T11:38:49+5:30
अजित पवारांकडून धरसोड वृत्तीची अपेक्षा नाही..
पुणे: महाविकास आघाडी सरकारमध्ये बेबंदशाही सुरु आहे. त्यांचे आप आपसात समन्वय नाही. एक जण म्हणते हे करा एक जण म्हणते ते करा ..असे कसे ना.? हे सरकार लबाड सरकार आहे अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
पुण्यामध्ये शुक्रवारी(दि.१२) चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांची वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना पाटील यांनी हे वक्तव्य केले आहे.
एमपीएससीच्या मुद्द्याचा संदर्भ देत पाटील म्हणाले; एकाच सरकारमधले वडेट्टीवार वेगळं म्हणतात? त्यांच्या सुरात सुर मिसळून पृथ्वीराज चव्हाण बोलतात. त्यांच्या सुरात सूर मिसळून नाना पटोले बोलतात.. सगळ्या विषयांमध्ये सरकारमधला प्रत्येक घटक हा वेगळी भूमिका मांडतो. वीजबिल विषयामध्ये तेच झाले आहे. आता काल त्यांनी तारीख दिली की आठ दिवसांत नवी तारीख देतो का विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवावा का? “
अजित पवारांकडून अशा धरसोड वृत्तीची अपेक्षा आपल्याला नव्हती असे म्हणत पाटील म्हणाले “ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अजित दादांनी वीज बिलासंदर्भात भूमिका घेतली. कनेक्शन कट करणार नाही सांगितले. आणि शेवटच्या दिवशी ते बदलले. अजित दादांकडून तरी माझी ही अपेक्षा नव्हती”
यावेळी गुरुवारी झालेल्या आंदोलन सहभागाबद्दल बोलताना पाटील म्हणाले “ जिथे जिथे अन्याय होतो तिथे तिथे भाजप उभे राहणारच आहे. भाजपचा कार्यकर्ता कधी लपून राहत नाही”
दरम्यान शहरात पुन्हा लॉकडाउन करु नये अशी भूमिका त्यांनी घेतली. अधिकचे निर्बंध घालावेत पण आर्थिक चक्र बिघडवू नये असे पाटील म्हणाले. मॉलसारख्या ठिकाणी जर गर्दी होत असेल तर टोकन देत मर्यादित लोकांना एकावेळी सोडले पाहिजे. पण नवी बंधने नकोत अशी भूमिका पाटील यांनी मांडली.