पुणे : भारताचे गृहमंत्री अमित शाह आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. पुणे महापालिकेतील विस्तारीत इमारतीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा याचे भूमिपूजन शाह यांच्या हस्ते झाल्यांनतर गणेश कला क्रीडा मंच येथे पुणे शहर भाजप कार्यकर्ते संमेलन आयोजित करण्यात आले होते. हजारो कार्यकर्त्यांच्या संख्येत सभागृह भरून गेले होते. यावेळी भाषणात ''महाविकास आघाडी सरकारने पेट्रोल, डिझेल स्वस्त करण्याऐवजी दारू स्वस्त केली'' असे मत अमित शाह यांनी व्यक्त केले आहे.
शाह म्हणाले, केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलचे दर कमी केले. त्यानंतर आम्ही देशातील इतर राज्यांना सुद्धा इंधनाचे दर कमी करण्याचे आवाहन केले. बऱ्याच राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दरही कमी केले. पण महाराष्ट्र सरकारने त्याऐवजी दारूचे दर कमी करून ठेवले आहेत. त्यांच्या ऐकण्यात काही वेगळे आले असे आम्हाला वाटले.
महाआघाडी सरकार संपण्याची सुरुवात पुण्यापासून होणार शिवसेना म्हणते सत्ता हाच माझा जन्मसिद्ध हक्क आह. त्यासाठी काहीही करायला तयार आहे. सत्तेतून पायउतार व्हा. तिघे एकत्र मिळून आमच्या विरोधात लढा असे आवाहन करतो. आमचा कार्यकर्ता घाबरत नाही. सिद्धांतरहित राजकारण कोणालाही आवडत नाही. महाआघाडी सरकार संपण्याची सुरुवात पुण्यापासून होणार आहे.
पुण्याच्या विकासाची अनेक कामे मोदी सरकारने केली
विमानतळ वाढवणे, मेट्रो ज्याचे तीन मार्ग केले, लवकरचं पुण्याला मेट्रो प्रवास सुरू होईल, बस दिल्या, मुळा मुठा नदी सर्वधन साठी निधी दिला, स्टार्टअपला प्रोत्साहन दिलं, पुण्याच्या विकासासाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे. पुण्याच्या विकासाची अनेक कामे मोदी सरकारने केली आहेत. आम्ही कुठही कमी पडणार नाही असा विश्वास शाह यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रासह संपूर्ण भारत देश देखील कोरोनामुक्त होवो
''महाराष्ट्रासह संपूर्ण भारत देश देखील कोरोनामुक्त होवो. आत्मनिर्भर भारताचे आपले ध्येय लवकर पूर्ण होवो आणि अयोध्येतील राममंदिराची उभारणी निर्विघ्नपणे होवो. असे मागणे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी दगडूशेठ गणपतीसमोर मागितले आहे. गणरायाला महाअभिषेक करताना शहा यांनी सुजलाम् सुफलाम् भारतासाठी देखील प्रार्थना केली.''