महाविकास आघाडी सरकार गोरगरिबांचे नव्हे तर आरोपींना संरक्षण देणारे; चित्रा वाघ यांचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 04:16 PM2022-03-24T16:16:44+5:302022-03-24T16:17:06+5:30
पुणे पोलीस बलात्का-यांची पिल्लावळ वाचवण्यात व्यस्त असल्याने शहरात कायदा-सुव्यवस्थेचा अक्षरश: बोजवारा उडाला
पुणे : रघुनाथ कुचिक प्रकरणात भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत काही पुरावे सादर केले. पिडितेला रुग्णालयात घेऊन जाणा-या राहूल बोरा या व्यक्तीने ‘सर्व यंत्रणा आमच्या हातात असून या केसचे पुढे काही होणार नाही’, असे मेसेज करत पिडितेवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप चित्रा वाघ यांनी केला. वाघ यांनी मेसेजचे स्क्रीन शॉट वाचून दाखवत, बलात्कारी लोकांना सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप केला. हे सरकार गोरगरिबांचे नसून, आरोपींना संरक्षण देणारे आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
वाघ म्हणाल्या, ‘कुचिक प्रकरणात पोलिसांना सगळे पुरावे दिले असूनही ते आरोपीला पाठीशी घालत आहेत. पुणे पोलीस त्यांच्या दावणीला बांधले गेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात सातत्याने अत्याचाराच्या घटना घडत आहेत. पुणे पोलीस बलात्का-यांची पिल्लावळ वाचवण्यात व्यस्त असल्याने शहरात कायदा-सुव्यवस्थेचा अक्षरश: बोजवारा उडाला आहे.’
न्याय मिळेपर्यंत लढतच राहणार
गृहमंत्री अॅक्शन मोडमध्ये आले असतील तर त्यांनी जरा या प्रकरणात लक्ष घालावे. बलात्काराचा गंभीर आरोप झाला असूनही सरकारला आपल्या पक्षातील नेत्याला राज्यमंत्री दर्जाच्या पदावरुन पायउतार करावेसे का वाटत नाही, असा सवाल वाघ यांनी केला. माझ्या चौैकशीचे आदेश देऊन दबाव निर्माण करणे म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यासारखे आहे. पण मी कोणत्याही परिस्थितीत गप्प बसणार नाही. न्याय मिळेपर्यंत लढतच राहणार. आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करु नका, असा इशाराही त्यांनी दिला.
''न्यायव्यवस्था, पोलीस प्रशासन आपल्या खिशात असल्याचे आरोपी आणि त्याच्या आसपासच्या लोकांना वाटत आहे. पिडितेला धमकी देण्याएवढी गुर्मी यांच्यात कोठून येते? कोणी कितीही प्रयत्न केले, तरी सत्य कधीच लपून राहत नाही. अशा व्यक्तीला चपलेने मारले पाहिजे. पुणे पोलिसांच्या वर्दीच्या आतमध्येही बाप दडलेला आहे. त्यांना पिडितेची दया येत नाही का? कोणी कितीही प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला तरी न्याय मिळेपर्यंत आमची लढाई सुरुच राहील असंही त्या यावेळी म्हणाल्या आहेत.''