'महाविकास आघाडी सरकारने विकासकाम दाखवा'; या स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या भाजपला अजितदादांचे जोरदार प्रत्यत्तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 11:29 AM2021-08-20T11:29:21+5:302021-08-20T11:33:27+5:30
पालकमंत्री या नात्याने अनेक विकासकामांचा आढावा घेत असतो आणि घेत आलो आहे
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप 'विकासाची पोलखोल' ही स्पर्धा जाहीर केली होती. यामध्ये पुण्यातील नागरिकांनी व्हिडिओ आणि सेल्फी फोटो पोस्ट करणार्या विजेत्या स्पर्धकास बक्षीसं देखील दिली जाणार होत. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातील सत्ताधारी भाजपने उडी घेत महाविकास आघाडी सरकारला आव्हान केले होते. शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी देखील अशाच प्रकाराची घोषणा केली असून राज्यात गेल्या दीड वर्षात सत्तेत असलेल्या महाआघाडी सरकारने पुणे शहरासाठी केलेले एक भरीव 'विकासकाम दाखवा' ही स्पर्धा आयोजित केली होती. त्यावरच अजित पवारांनी पुण्यातील भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
पवार म्हणाले की, आज शहरातील नदी सुधार कार्यक्रमाकरता आयुक्तांसोबत बैठक घेतली आहे. महाविकास आघाडी सरकारने काय केलं ते दाखवा, असे बक्षीस भाजपकडून जाहीर करण्यात आले आहे. पण मी पालकमंत्री या नात्याने अनेक विकासकामांचा आढावा घेत असतो आणि घेत आलो आहे. त्यामध्ये पुण्यातील विकास कामांना निधी देण्याचं काम केले आहे. मेट्रोचा हप्ता थकायला नको म्हणून प्रयत्न करत आहे. मेट्रोचं जाळं शहराच्या चारी बाजूने कसे नेता येईल यासाठी माझा प्रयत्न असल्याचं सांगत त्यांनी भाजपाच्या नेत्यांना टोला लगावला.
वन विभागाच्या ३५ एकर जागेमध्ये भव्य संजीवन उद्यानाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी अजित पवार बोलत होते.
महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून अनेक विकास कामे केली जात आहेत
''राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून अनेक विकास कामे केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आपण आज वन विभागाच्या ३५ एकर जागेमध्ये भव्य संजीवन उद्यानाचे भूमिपूजन केले आहे. या ठिकाणी विविध प्रकारचे वृक्ष पाहण्यास मिळणार आहे. या उद्यानात येणार्या नागरिकांना चांगली हवा मिळणार आहे. पण आता यामध्ये काही झाडे तोडली जाणार आहेत. पण तिथे अधिकाधिक नव्याने झाडे लावली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.''