महविकास आघाडीची सभा; हे कुणी सांगितलं? पुण्यातील सभेबाबत अजितदादांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 07:30 PM2022-04-28T19:30:29+5:302022-04-28T19:34:54+5:30
पुण्यात महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवार ३० एप्रिल रोजी सायं. ५.०० वा लोकमान्य टिळक (अलका टॉकिज) चौक येथे महाविकास आघाडीची सभा होणार आहे.
पुणे : पुण्यात महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवार ३० एप्रिल रोजी सायं. ५.०० वा लोकमान्य टिळक (अलका टॉकिज) चौक येथे महाविकास आघाडीचे घटक पक्ष काँग्रेस + राष्ट्रवादी काँग्रेस + शिवसेना तसेच डावे, पुरोगामी पक्ष संघटना यांच्या वतीने महाराष्ट्र सद्भावना निर्धार सभा आयोजित केली आहे. या सभेमध्ये राज्यपातळीवरील आणि शहरातील स्थानिक नेते सभेला संबोधित करणार आहेत. तसेच सर्व बडे नेते या सभेला उपस्थित राहणार असल्याची जोरदार चर्चा सुरु होती. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता त्यांनी सवाल उपस्थित केला आहे.
पवार म्हणाले, पुण्यामध्ये होणाऱ्या ३० तारखेच्या सभेच मी पहिल्यांदाच ऐकत आहे. हे तुम्हाला कुणी सांगितलं असा सवाल त्यांनी पत्रकारांसमोर उपस्थित केला आहे. तर ही गोष्टी कुणी पसरवली हे मला माहित नसल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, नाना पटोले हे सर्व नेते अशा सभेबाबत निर्णय घेतात. त्यांच्याशी माझी चर्चा झालेली नाही. पण यांच्याशिवाय अन्य कोणी नेता असेल तर त्यांचं नाव सांगा. मी त्यांना विचारतो असे त्यांनी सांगितले आहे.
हा निर्धार या सभेमधून व्यक्त केला जाणार
''देशामध्ये राज्यांची आर्थिक आणि राजकीय कोंडी करणारे निर्णय केंद्रामधील मोदी सरकार घेत आहे. त्यामधून घटनेमध्ये अपेक्षित असलेल्या संघराज्यात्मक लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लागत आहे. केंद्र सरकारची एक पक्षीय नोकरशाही व जुलूमशाही लादण्याचे उद्दीष्ट स्पष्टपणे दिसत आहे. संसदेमध्ये विरोधकांचा आवाज दडपून राज्यांचे करविषयक अधिकार, राज्यांचे करउत्पन्न, कामगार तसेच शेती विषयक कायदे, कायदा सुव्यवस्थेबाबतचे अधिकार तसेच नोकरशाहीवरील नियंत्रणाचे अधिकार अशा प्रत्येक बाबतीमध्ये महाराष्ट्राची जाणीवपूर्वक कोंडी केली जात आहे. राजकीय विरोधकांना दडपण्यासाठी केंद्रिय यंत्रणांचा बेबंद गैरवापर केला जात आहे. महाराष्ट्रातील जनता केंद्राची ही घटनाविरोधी दादागिरी सहन करणार नाही. हा निर्धार पुण्यात होणाऱ्या सभेमधून व्यक्त केला जाणार असल्याचे पुणे महाविकास आघाडीने सांगितले आहे.''