पुणे : महाविकास आघाडीच्या सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज होत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटना मात्र नाराज असल्याचे समजते. संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी सध्या पुण्यात असून ते शपथविधी सोहळ्याला जाणार नसल्याचे समजते.
याबाबत अधिक माहिती अशी की, मंत्रिमंडळ विस्तार करताना सर्व घटक पक्षांना सामावून घेऊ, असे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी वारंवार सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात यादीत स्वाभिमानाच्या एकाही नेत्याचे नाव नाही. आज दुपारी 1 वाजता विधानभवनाच्या प्रांगणात शपथविधी सोहळा संपन्न होणार असून शेट्टी व रविकांत तुपकर यांनी पुण्यात थांबणे पसंत केले आहे. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तार बैठकीलाही स्वाभिमानाला आमंत्रण नव्हते. त्यामुळे ते शपथविधीपासून दूर राहणार असल्याचे समजते.
दरम्यान, 2014च्या भाजप - शिवसेना युतीमध्येही सुरुवातीला कोणत्याही घटक पक्षाला मंत्रिपद देण्यात आले नव्हते. नंतरही अनेकदा जाहीरपणे नाराजी व्यक्त केल्यावर त्यांना मंत्रिपद देण्यात आले. त्यामुळे आता ही नाराजी स्वाभिमानाला मंत्रिपदापर्यंत नेते का हेच बघावे लागणार आहे.