भाजपच्या पराभवासाठी 'मविआने' एकदिलाने काम करावे; रवींद्र धंगेकरांनी घेतली मल्लिकार्जुन खर्गेंची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 11:53 AM2023-03-09T11:53:33+5:302023-03-09T11:53:43+5:30

दिवसेंदिवस केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यांमधील भाजप सरकार यांच्या विरुद्धचा जनतेच्या मनातील रोष वाढतोय

mahavikas aghadi should work unitedly for the defeat of BJP Ravindra Dhangekar met Mallikarjun Kharge | भाजपच्या पराभवासाठी 'मविआने' एकदिलाने काम करावे; रवींद्र धंगेकरांनी घेतली मल्लिकार्जुन खर्गेंची भेट

भाजपच्या पराभवासाठी 'मविआने' एकदिलाने काम करावे; रवींद्र धंगेकरांनी घेतली मल्लिकार्जुन खर्गेंची भेट

googlenewsNext

पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघात विकास आघाडीचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी बंगळुरू येथे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. खर्गे यांनी धंगेकर यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी उपस्थित होते.

दिवसेंदिवस केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यांमधील भाजप सरकार यांच्या विरुद्धचा जनतेच्या मनातील रोष वाढत आहे. महागाई, बेकारी यामुळे त्रस्त जनतेला परिवर्तन अपेक्षित आहे. त्यादृष्टीने महाविकास आघाडीचा कसबा मतदारसंघातील विजय हा दिशादर्शक आहे. महाविकास आघाडीचे सर्व नेते व कार्यकर्ते यांनी एकजुटीने कठोर मेहनत करून भाजपच्या बालेकिल्ल्यात विजय संपादन केला. याचाच अर्थ एकत्रित ताकदीने निवडणुका लढविल्या तर भाजपचा पराभव होऊ शकतो, हे या निवडणुकीने दाखवून दिले आहे. आगामी काळातही महाविकास आघाडीने भाजपचा पराभव करण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम केले पाहिजे, असे मत खर्गे यांनी व्यक्त केले.

उद्धव आणि राज ठाकरे यांचीही घेतली भेट

आमदार रवींद्र धंगेकर यांनी बुधवारी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी काँग्रेससह शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरातील पदाधिकारी उपस्थित होते. तसेच त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही भेट घेतली. दोन्ही ठाकरेंनी धंगेकर यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Web Title: mahavikas aghadi should work unitedly for the defeat of BJP Ravindra Dhangekar met Mallikarjun Kharge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.