लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने वकीलच दिला नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीच केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याचे उत्तर राज्यातील ओबीसी समाजाला द्यावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी आघाडीच्या वतीने करण्यात आली. त्याच्या निषेधार्थ आघाडीच्या वतीने बुधवारी राज्यात निदर्शने करण्यात येणार आहे.
आघाडीचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार योगेश टिळेकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. टिळेकर म्हणाले की, त्यांचेच नेते आता ओबीसींची फसवणूक कशी झाली ते सांगत आहेत. भाजपचे नेते सरकारला वारंवार ओबीसींची आवश्यक ती माहिती जमा करण्याबाबत सांगत होते. मात्र सरकारने हलगर्जीपणा केला. त्याचा परिणाम म्हणून आज राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ओबीसी आरक्षणाशिवाय होत आहेत. ओबीसी समाजाच्या या नुकसानीला महाविकास आघाडी सरकारच जबाबदार आहे. त्यामुळेच त्यांच्या विरोधात बुधवारी राज्यभर निदर्शने करण्यात येणार आहेत.
ओबीसींच्या आरक्षणाबाबत सरकार गंभीर नाही हे ते ज्या पद्धतीने या महत्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष करत आहे त्यावरून दिसत आहे, अशी टीका टिळेकर यांनी केली. भाजपच्या सरकारने ओबीसींच्या आरक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती टिळेकर यांनी दिली.