धायरी : लखीमपूर खेरी येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. शिवसेनाकाँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येत सिंहगड रस्ता परिसरातील धायरी भागातील मुख्य बाजारपेठेत मोर्चा काढून बंदचे आवाहन केले. दरम्यान, परिसरात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. मात्र महाविकास आघाडीच्या वतीने शंभर टक्के बंद यशस्वी झाला असल्याचे सांगण्यात आले.
उत्तरप्रदेशातील लखीमपुर खेरी या गावातील शेतकऱ्यांना वाहनांनी चिरडून मारण्याचा प्रकार हा अत्यंत निंदनीय व चिड आणणारा आहे. याच निर्दयी कृत्याचा निषेध म्हणून महाविकास आघाडी सरकारने सोमवारी महाराष्ट्र बंदची घोषणा केली. खडकवासला विधानसभा मतदारसंघातील सर्व महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपा सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी पायी मोर्चाचे आयोजन केले. हा मोर्चा धायरी येथील भैरवनाथ मंदिर ते वीर बाजी पासलकर पुलापर्यंत काढण्यात आला.
आज केंद्र सरकारच्या विरोधात समाजातील प्रत्येक घटक उभा राहिला :- रुपाली चाकणकर
''शेतकऱ्यांच्या आंदोलनावर केंद्र सरकारच्या वतीने दडपशाही करण्यात येत आहे. शेतकऱ्यांवर हल्ले केले जात आहेत. ब्रिटिश राजवटीपेक्षा भयाण स्थिती आज देशात झाली आहे. आज केंद्र सरकारच्या विरोधात समाजातील प्रत्येक घटक उभा राहिला आहे असे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी यावेळी सांगितले.''
काँग्रेसचे प्रदेश सचिव श्रीरंग चव्हाण, राष्ट्रवादी खडकवासला मतदार संघाचे अध्यक्ष काकासाहेब चव्हाण,संतोष चाकणकर, स्वाती पोकळे, सुनीता डांगे, प्रभावती भूमकर, राजेश्वरी पाटील, शरद दबडे,भूपेंद्र मोरे, काँग्रेस खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष राहुल मते, शिवसेना खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष नितीन वाघ आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.