कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच शासकीय आदेशाचे व नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करून यावेळी होणारे ध्वजारोहण, नित्यअभिषेक, चढावे, पूजन महाभिषेक, भगवान महावीरांचा भव्य पालखी सोहळा, महाआरती, सत्कार समारंभ, वार्षिक अहवाल वाचन, जन्मोत्सव-पाळणा, महाप्रसाद इ. विविध सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
भ. महावीर भगवान यांनी उपदेश दिलेल्या अहिंसा, शांती व संयम या तत्त्वांवर चालण्याची सध्या नितांत गरज आहे.
जेव्हा जेव्हा देशावर गंभीर संकट ओढवलं, तेव्हा तेव्हा जैन समाज खंबीरपणे सढळ हाताने, राष्ट्राला, राज्याला अर्थातच समाजाला मदत करायला उभा ठाकलेला असतो. जैन सुपुत्र वीर भामाशाह ज्यांनी देशासाठी संपूर्ण संपत्तीचा त्याग केला, त्यांच्या देशभक्तीचा आदर्श आम्हा संपूर्ण जैन समाजाच्या डोळ्यांसमोर आहे.
देशाच्या ह्या संकटकाळी शासनाने ठरवून दिलेले नियम पाळणे हीच आमची खरी देशभक्ती आहे. तर महावीरांप्रतिही खरी भक्ती आहे.
सामाजिक जाणीव, सामाजिक भावना आदी गोष्टी लक्षात घेऊन, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी मंदिरातील पंडितजी फक्त धार्मिक विधी महावीरजन्म कल्याणकच्या दिवशी करतील. अशी माहिती भगवान महावीर मंडळाचे ट्रस्टी यांनी कळविले आहे. दिगंबर जैन समाजातील सर्व लोकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.