पुणे : वीज मीटरमध्ये आणि यंत्रणेमध्ये रिमोट कंट्रोलचा वापर करून कोट्यवधीची वीजचोरी राजरोसपणे सुरू असल्याचे गेल्या तीन महिन्यांत महावितरणकडून शहरात करण्यात आलेल्या कारवाईत समोर आले आहे. विशेष म्हणजे, एकीकडे सर्वसामान्यांवर वाढत्या वीज दरवाढीचा बोजा पडत असताना, अनेक हॉटेल आणि कंपन्या राजरोसपणे वीजचोरी करत असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे. दरम्यान, ही कारवाई मोहीम या पुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणचे मुख्य अभियंता रामराव मुंडे यांनी सांगितली.नवीन इलेक्ट्रॉनिक मीटर मध्येही फेरफार बड्या कंपन्यांबरोबरच शहरात हॉटेल व्यावसायिक आणि घरगुती वापर असलेल्या ग्राहकांकडून वीज मीटर रिमोटद्वारे नियंत्रित केला जात असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी मुंढवा येथील एका बर्फाच्या कारखान्यात महावितरणचा मीटरच गायब करून, दुसरी यंत्रणा लावल्याचे आढळून आले आहे, तर काही ग्राहकांनी एकाच मीटरला दोन वीजप्रवाह देऊन, या मीटरमध्ये फेरफार केला असल्याचे निदर्शनास आले आहे, अशा ग्राहकांकडून जवळपास ३ कोटींची दंड वसुली करण्यात आली आहे. तीन महिन्यांत ४ कोटींची वीजचोरी महावितरणच्या पुणे परिमंडळांकडून वीजचोरी करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई मोहीम हाती घेण्यात आली आहे. आॅक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांत सुमारे २५ लाखांपेक्षा अधिक युनिटची म्हणजे, ३ कोटी ७५ लाखांची वीजचोरी उघडकीस आली असून, १४५ पेक्षा अधिक जणांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात घरगुतीसह प्रामुख्याने औद्योगिक, व्यावसायिक वीजग्राहकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या मोहिमेत काही आयटी कंपन्यांवरही कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडूनही लाखो रुपयांची वीजचोरी झाली असल्याची माहिती समोर आली आहे. महावितरणकडून संगणक यंत्रणेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वीज वापर असणाऱ्या ग्राहकांचा वापर; तसेच त्यांच्या बिलांच्या रकमेवर नजर ठेवली जात आहे. ज्या कंपन्यांची बिले या आधी मोठ्या प्रमाणात येत होती, ती अचानक कमी होणे, जोडणी घेताना किती विजेची मागणी होती, पण प्रत्यक्षात किती वापरली जात आहे अशा प्रकारे माहितीचे विश्लेषण करून संबंधितांवर कडक नजर ठेवली जात आहे.
वीजचोरांच्या विळख्यात महावितरण
By admin | Published: January 09, 2016 1:48 AM