दौंड : सातत्याने होणाऱ्या भारनियमनाला वैतागून आज अखेर दौैंड शहरात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. या वेळी महावितरणच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. अघोषित भारनियमन मागे घेण्यात यावे, अशी मागणी या वेळी निवेदनाद्वारे करण्यात आली. दौंड शहरात सुरूकेलेल्या विद्युत भारनियमनामुळे शहरातील नागरिक हैराण झाले आहेत. अचानक दररोज सहा तास भारनिमन होत आहे. पहिल्या आठवड्यात सकाळी सहा ते सव्वानऊ, सायंकाळी सव्वापाच ते रात्री सव्वाआठ, तर दुसऱ्या आठवड्यात सकाळी अकरा ते दुपारी सव्वादोन, सायंकाळी सव्वापाच ते रात्री सव्वाआठ असे भारनियमन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा काढण्यात आला. शिवाजी चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. सर्व कार्यकर्ते महावितरणच्या कार्यालयात घुसले. शाखा अभियंता रोहित जाधव यांना घेराओ घालण्यात आला. या वेळी दौंड शुगरचे ज्येष्ठ संचालक वीरधवल जगदाळे, दौंड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. अजित बलदोटा, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजेंद्र खटी, दौंड मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष राजेश पाटील, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजू ओझा, यांनी संतप्त भावना आपल्या व्यक्त केल्या. त्यानंतर शहरात ज्यांचे वीजबिल थकले असेल अशांचे वीज कनेक्शन तोडा परंतु जे प्रामाणिकपणे वीजबिल भरतात त्यांच्यावर अन्याय करूनका. थकीत बिलापोटी भारनियमन करू नये असे निवेदनात म्हटले आहे. बादशाह शेख, प्रवीण परदेशी, सुनील शर्मा, नागसेन धेंड, अनिल साळवे, गुरुमुग नारंग, हरेश ओझा, राजेश गायकवाड, संतोष जगताप, सचिन कुलथे, अशोक जगदाळे, अनिल सोनवणे, निखिल स्वामी, प्रशांत धनवे, गनीभाई सय्यद, संदिपान वाघमोडे, आनंद बगाडे, अजय कटारे, सागर पाटसकर यांनी हे निवेदन दिले. (वार्ताहर)
दौंडमध्ये महावितरणवर मोर्चा
By admin | Published: October 16, 2015 1:18 AM