- नितीन चौधरी
पुणे : ठाणे परिसरातील काही भागांत अदानी पॉवर कंपनीला वीजवितरणाची परवानगी देण्याचे घाटत असून या विरोधात महावितरणमधील अभियंते तसेच कर्मचाऱ्यांनी आवाज उठवला आहे. मात्र, राज्य सरकारने याकडे साफ दुर्लक्ष केल्याने या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मंगळवारच्या मध्यरात्रीपासून तीन दिवसांच्या (ता. ६ पर्यंत) संपाचे हत्यार उसपले आहे. आपत्कालिन परिस्थितीत वीज गेल्यास सबंध राज्य अंधारात जाण्याची भीती आहे. राज्य सरकारने अदानीला ही परवानगी दिल्यास सामान्य ग्राहक तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची वीज मिळणार नाही अशी भीतीही हे अधिकारी कर्मचारी व्यक्त करत आहेत. या संपात राज्यातील सुमारे १ लाख तर पुणे परिमंडळातील साडेचार हजार जण सहभागी होत आहेत.
केंद्र सरकारप्रमाणेच राज्य सरकार खासगीकरणाकडे वळले असून आता महावितरणच्या खासगीकरणाचा डाव साधला जात आहे. त्यानुसार अदानी पॉवर कंपनीने महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडून ठाणे परिसरातील वाशी, उरण भांडूप व ठाणे या चार ठिकाणी वीज वितरणाचा परवाना मिळवला आहे. मात्र, राज्य सरकारने याला अधिकृत परवानगी दिलेली नाही. ही परवानगी दिल्यास या कंपनीकडून सामान्य ग्राहकांना क्रॉस सबसिडीतून मिळणारी कमी दरातील वीज मिळणार नाही. तसेच शेतकऱ्यांनाही महागड्या दराने वीजड खरेदी करावी लागणार आहे. भरीस भर या कंपनीला परवाना देताना महावितरणची वितरण व्यवस्था वापरण्यास देण्याची शक्यता आहे. त्यामुळे जनतेच्या पैशांतून उभ्या राहिलेल्या या व्यवस्थेचा लाभ घेऊन ही कंपनी ग्राहकांना आपल्या सोयीनुसार वीजदर आकारणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने अदानी पॉवर कंपनीला परवाना देऊ नये अशी मागणी महावितरणमधील अभियंते तसेच कर्मचारी संघटनांनी केली आहे.
याबाबत मुंबईत सोमवारी ऊर्जा सचिवांसोबत झालेल्या बैठकीत ३० संघटनांनी सहभाग घेतला. परंतु त्यात कोणताही तोडगा न निघाल्याने हा संप मंगळवारी मध्यरात्रीपासून शुक्रवारपर्यंत (ता. ६) चालणार आहे, अशी माहिती सबऑर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशनचे झोनल मॉनिटर विश्वास भोसले यांनी दिली. या संपात पुणे परिमंडळातील साडेचार हजार, बारामती परिमंडळातील पाच हजार अभियंते, वायरमन, लाईनमन तसेच कंत्राटी कर्मचारी सहभागी होणार आहेत. त्यामुळे आपत्कालिन परिस्थितीत वीज गेल्यास राज्य अंधारात जाऊ शकते अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
पर्यायी व्यवस्था तयार
दरम्यान हा संप झाल्यास पुणे परिमंडल अंतर्गत आपत्कालीन व्यवस्था करण्यात आली आहे. त्याद्वारे सर्वच ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत राहील याची खबरदारी घेतली जात आहे. नागरिकांनी वीजपुरवठ्याबाबत कोणत्याही नकारात्मक व चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नये. वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी पर्यायी यंत्रणा युद्धपातळीवर २४ तास सज्ज आहे. काही तक्रारी किंवा शंका असल्यास महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा व संपाच्या कालावधीत सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.