भोसरी : कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे भोसरी व परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दोन महिने वीजबिल नागरिकांना घरपोच देण्यासाठी महावितरणच्या कंत्राटदाराने टाळाटाळ केल्याने नागरिकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. रीडिंग बरोबर असूनही जवळपास या भागातील बऱ्याच ठिकाणी हजारो रुपयांची वीज बिले नागरिकांना आली आहेत. नागरिकांनी महावितरणकडे विचारणा केली असता, हा प्रकार उघडकीस आला. महावितरणकडून दर महिन्याला वीजवापराची बिले आकारली जातात व ती ग्राहकांनी वेळेवर भरल्यास दंड व इतर खर्च लावले जात नाहीत. काही वर्षांपूर्वी तीन-तीन महिन्याला वीजबिल नागरिकांना अदा केली जात असत. मात्र महावितरण कंपनी स्थापन झाल्यापासून प्रत्येक महिन्याला बिल आकारले जाते. भोसरी परिसरातील आदिनाथनगर, गव्हाणेवस्तीसह काही भागांत गेल्या दोन-तीन महिन्यांचे वीजबिल महावितरणकडे पाठविण्यात आले नव्हते आणि गेल्या आठवड्यात नागरिकांना पाच हजार, दहा हजार या पटीत बिल येऊ लागल्याने नागरिक महावितरणच्या कार्यालयात खेटे घालत आहेत. महावितरणच्या येथील कार्यालयात नागरिकांनी याबाबत तक्रार केली असता, महावितरणकडून ग्राहकांना वीजबिले पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र बिल वितरण करणाऱ्या कंत्राटदाराने स्वत:च्या कामातून वेळ मिळाला नसल्याने ग्राहकांपर्यंत बिल पोहोचविले नाही. (वार्ताहर)
महावितरणचा भोसरीकरांना झटका
By admin | Published: December 10, 2015 1:13 AM