तळवडे : महावितरण वीज वितरण कंपनीकडून वेळेवर वीज बिले मिळत नाहीत, मीटर रिडिंग वेळेवर घेतले जात नाही, चुकीचे बिल आले, वापरापेक्षा जास्त बिल आले या नेहमीच्या तक्रारींचे निवारण होते न होते तोच आणखी एका समस्याची भर पडली आहे. ती म्हणजे वीज बिलाचे चुकीचे मेसेज येऊ लागल्यामुळे ग्राहकांना मनस्ताप होत आहे.महावितरणच्या वतीने आता आॅनलाइन वीज भरण्यासाठी मोबाईल अॅप्लिकेशन तयार करण्यात आले आहे, तसेच वीज बिल तयार झाल्यानंतर ग्राहकांना थेट मेसेज पाठविण्यात येत आहेत. परंतु एका ग्राहकाला वापरापेक्षा जास्त रक्कमेच्या बिलाचा मेसेज आला आणि त्याने थेट महावितरण कार्यालयात भेट देत आपली समस्या कर्मचाऱ्यांना सांगितली, कर्मचाऱ्यांनी सदर गृहस्थाच्या मोबाईलमधील बिल आणि जुने बिल पडताळून पाहिले असता दुसऱ्याच कोणत्या तरी ग्राहकाच्या बिलाचा मेसेज आला असल्याचे सांगितले, त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर चुकीच्या बिलाला जोडला असून, कॉल सेंटरला फोन करून तक्रार करण्याचा सल्ला दिला. परंतु या प्रकारात माझा काय दोष आणि मी का त्रास सहन करायचा. तसेच त्या ग्राहकाने महावितरणच्या पदाधिकाऱ्यांना लोकमतच्या बातमीचा दाखला देत चुकीचे बिल आल्याबद्दल आता कारवाई कोणावर करणार असा प्रश्न विचारून त्या ग्रहस्थाने कर्मचाऱ्यांना निरुत्तर केले. (वार्ताहर) खडकीकरही हैराण : उर्जामंत्र्यांना निवेदनखडकी : वेळेवर मीटर रीडिंग न घेणे, अंदाजे वीजदेयक पाठवणे, ग्राहकाला कल्पना न देता नवीन मीटर बसविणे व त्याबाबत देयकातून मोठी रक्कम आकारणे, वर्षाकाठी अनामत रकमेच्या नावाखाली मन मानेल तसे शुल्क आकारणे, चुकीची देयक पाठवणे, अधिका-यांचा आडमुठेपणा आदी समस्यांमुळे खडकीकर महावितरणला चांगलेच वैैतागले आहेत. ग्राहकांना वीज देयकाच्या माध्यमातून लुबाडले जाते. ग्राहकांनी तक्रार केलीच, तर त्या कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून ‘आधी बिल भरा नंतर एक अर्ज द्या’ असे सांगितले जाते. या ग्राहकांच्या तक्रारींकडे लक्ष वेधून खडकीतील वंदे मातरम् संघटनेने राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महावितरण विभागाच्या वीज देयकांमधील चुकीच्या पद्धतीची चौकशी करण्याची मागणी केली आहे. वीज देयक भरण्याचा दिनांक १ ते १० तारखेदरम्यान असावा. सुरक्षा ठेव रकमेवर ग्राहकांना व्याज मिळावे, दरमहा नियमित विजेचे बिल भरणाऱ्या ग्राहकाला स्थिर आकार आकारू नये, वीज देयक हे सर्वसामान्य ग्राहकांना कळावे असे छापून वितरित करावे , अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.महावितरणच्या रास्ता पेठेतील मुख्य कार्यालयात जनता दरबार भरवण्यात आला होता. त्या वेळी संघटनेच्या वतीने ऊर्जामंत्री बावनकुळे यांना खडकी विभागाध्यक्ष शिरीष रोच यांनी निवेदन दिले. या प्रसंगी संघटनेचे प्रांत अध्यक्ष विकास हांडे, कार्याध्यक्ष राजेश शर्मा व संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
महावितरणचा अनागोंदी कारभार
By admin | Published: May 03, 2017 2:18 AM