पुणे : शहरात दोन दिवस झालेल्या वळवाच्या पावसानंतर नगर रस्ता परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात दिरंगाई करणाऱ्या विश्रांतवाडी विभागाचे सहायक अभियंता एस. जे. पुलिकेन यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती महावितरणचे जनसंपर्क अधिकारी निशिकांत राऊत यांनी दिली. सोमवारी (दि. ९) शहरात मध्यरात्री झालेल्या वादळी पावसानंतर वीजपुरवठा सुरळीत करण्याची जबाबदार या अधिकाऱ्यावर असतानाही पुलिकेन यांनी दिरंगाई केल्याचे महावितरणकडून करण्यात आलेल्या पाहणीत दिसून आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून शहरात वादळासह गारपीट व मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे जोराच्या वाऱ्याने अनेक ठिकाणी झाडे पडून वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटना घडत आहेत. अशा घटनांनंतर तातडीने वीजपुरवठा सुरू करण्याच्या सूचना सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. दि.९ रोजी मध्यरात्री झालेल्या पावसात नगर रस्ता परिसर तसेच विश्रांतवाडी विभागात जय गणेश विश्व, भीमनगर, वैभव कॉलनी, आशीर्वाद कॉलनी यासह या परिसरात मध्यरात्री वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर नागरिकांकडून तक्रारी करण्यात आल्यानंतरही तो सुरळीत करण्याबाबत अपेक्षित कार्यवाही केली गेली नसल्याचे दिसून आले. त्यामुळे पुलिकेन यांना निलंबित केल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.
सहायक अभियंत्याला महावितरणचा ‘झटका’
By admin | Published: May 13, 2016 1:35 AM