शिरूर : कोरोना लॉकडाऊन काळात अडचणीत आलेल्या सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या रकमेचे वीजबिल दिल्याच्या निषेधार्ह शिरूर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी शिरूर वीज वितरण कार्यालयात आंदोलन करत कार्यालय अधिकाऱ्याच्या केबिनची तोडफोड केली. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तीन आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शिरूर शहरासह तालुक्यातील नागरिकांना मार्च महिन्यापासून वाढीव बिले आली आहे. कोरोना काळात लॉकडाऊनमुळे आधीच नागरिक अडचणी आले असताना मोठ्या रक्कमेचे वीज बिल कमी करण्यासाठी सर्वसामान्य नागरिक वीज वितरण कार्यालयात चकरा मारत आहे. परंतु अधिकारी जागेवर नाहीत. आधीच कोरोनामुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. त्यात महावितरणे वाढीव बिले देऊन नागरिकांना अडचणीत आणल्याचा आरोप मनसेच्या वतीने करण्यात आला आहे. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना माहिती मनसे कार्यकर्त्यांनी दिली. परंतु उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने मनसे कार्यकर्त्यांनी मंगळवारी थेट महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढला. या आंदोलनात मनसे शहर अध्यक्ष अविनाश घोगरे, मनसे जनहित कक्ष जिल्हा अध्यक्ष सुशांत कुटे, मनसे कामगार आघाडी तालुकाध्यक्ष रवींद्र गुळादे आदी सहभागी झाले होते.
यावेळी कार्यालयाबाहेर अनेक नागरिक वीज बिले कमी करण्यासाठी आले होते. परंतु अधिकारी नसल्याने त्यांची गैरसोय झाली. यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी थेट कार्यालयाची तोडफोड केली. यात टेबल, खुर्ची, काच फोडल्याने नुकसान झाले आहे. ...... कोरोना महामारीमुळे सामान्यांचे प्रचंड हाल होत आहे. त्यात वाढीव विजबीलाने लोकांचे कंबरडे मोडले आहे. याच संदर्भात आम्ही विचारणा करण्यासाठी गेलो असता तिथे कुणीच नव्हते. त्यामुळे आम्ही मनसे स्टाईल आंदोलन केले. सुशांत कुटे, जिल्हाध्यक्ष मनसे जनहित कक्ष
तिघांवर गुन्हा दाखल या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात वीज वितरण कंपनीच्या कर्मचा-याने दिलेल्या तक्रारीनुसार मनसे शहर अध्यक्ष अविनाश घोगरे, मनसे जनहित कक्ष जिल्हा अध्यक्ष सुशांत कुटे, मनसे कामगार आघाडी तालुकाध्यक्ष रवींद्र गुळादे या तिघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.