लोणावळा (पुणे) : महाराष्ट्रात महायुती मजबूत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असण्याचे कारण नाही. महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत संविधानाबाबत चुकीचा प्रचार केल्याने त्याचा फटका महायुतीला बसला, हे खरे आहे. मात्र, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही सर्वजण जनतेपर्यंत जाऊन १७० ते १८० जागा निश्चित जिंकू, असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी व्यक्त केला.
मुंबई-पुणे प्रवासादरम्यान लोणावळा शहरात महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून आठवले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.
लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला महायुतीकडून एकही जागा देण्यात आली नाही. मात्र, येणाऱ्या विधानसभेमध्ये आठ ते दहा जागा आम्ही घेणार असून, त्या जिंकण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते सज्ज झाले असल्याचे आठवले यांनी सांगितले.
अजित पवार गटाला केंद्रात मंत्रिपद
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला केंद्रात एक मंत्रिपद देण्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे ते महायुतीमध्ये नाराज असण्याचे कारण नाही. महायुती बळकट असून, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत निश्चित जनाधार मिळेल, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.