पुणे : हडपसरविधानसभा मतदारसंघात महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने चेतन तुपे यांना उमेदवारी दिली, तर मनसेने शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांना संधी दिली आहे. महाविकास आघाडीमध्ये मात्र या जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष की शिवसेनेचा ठाकरे गट यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू आहे. या जागेचा तिढा सुटून लवकरच उमेदवार जाहीर केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यावरून आता तरी या मतदारसंघात तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात आली. त्यामध्ये २००९ मध्ये हडपसर मतदारसंघ तयार झाला. या मतदारसंघात २००९ मध्ये शिवसेनेचे महादेव बाबर निवडून आले होते. त्यानंतर, २०१४ मध्ये भाजपचे योगेश टिळेकर आमदार झाले. २०१९ मध्ये टिळेकरांचा पराभव करत राष्ट्रवादीचे चेतन तुपे आमदार झाले. त्यामुळे या मतदारसंघात सातत्याने बदल झाल्याचे दिसते.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट यांची महायुती, तर काँग्रेस, उद्धवसेना, राष्ट्रवादीचा शरद पवार गट यांची महाविकास आघाडी आहे. महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने हडपसरमधून चेतन तुपे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असणारे शिवसेनेच्या शिंदेगटाचे शहराध्यक्ष प्रमोद नाना भानगिरे यांचा पत्ता कट झाला आहे. मनसेने शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीकडून लवकरच उमेदवार जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे.
शिवसेनेच्या शिंदेगटाला पुण्यात एकही जागा नाही
पुणे शहरात आठ विधानसभा मतदारसंघ असून, जागावाटपात महायुतीमध्ये भाजपला कोथरुड, पर्वती, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट, खडकवासला आणि कसबा हे सहा मतदारसंघ आहेत, तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे वडगाव शेरी, हडपसर मतदारसंघ आहे. हडपसर मतदारसंघ शिवसेनेच्या शिंदे गटाला मिळण्यासाठी प्रयत्न केला जात होता. त्यासाठी शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे प्रयत्न करत होते. मात्र, हडपसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या शिंदेगटाला पुण्यात एकही जागा मिळालेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रमाेद नाना भानगिरे यांचा पत्ता कट झाला आहे.