चाकण : खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे यांनी महायुतीचे उमेदवार दिलीप मोहिते पाटील यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केल्याने येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत महायुतीसाठी धोक्याची घंटा उभी राहिली आहे.
सांडभोरवाडी - काळूस, वाडा - कडूस, वाशेरे - नायफड, पिंपरी - पाईट आणि रेटवडी - पिंपळगाव या पाच जिल्हा परिषद गटात महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे यांना मोठ्या मतांची आघाडी राहिली, तर दोन जिल्हा परिषद गटांमध्ये दोन हजार मतांपेक्षा कमी मते मिळाली. परंतु, एकही जिल्हा परिषद गटामध्ये महायुतीचे उमेदवार दिलीप मोहिते पाटील यांना युतीच्या नेत्यांकडून अपेक्षित मतांची आघाडी मिळू शकली नाही. यावरून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये दिलीप मोहिते पाटील यांना मोठा फटका बसण्याची शक्यता असून, त्यांच्यासाठी हा धोक्याचा इशारा असल्याची चर्चा खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात रंगली आहे.
खेड-आळंदी मतदारसंघात महायुतीचे उमेदवार दिलीप मोहिते पाटील व महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे यांच्यात समोरासमोर थेट लढत झाली. मोहिते पाटील यांना मागील २०१९ च्या निवडणुकीत सुमारे ३३ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. यावेळी तालुक्यातील नेत्यांनी २०१९ ची चूक न करता एकास एक उमेदवार देऊन ही निवडणूक लढविल्याने शिवसेनेच्या बाबाजी काळे यांनी दिलीप मोहिते पाटील यांचा तब्बल ५१ मतांनी पराभव करत विजयाची माळ पटकावली आहे.
खेड तालुक्यातील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक, पुणे जिल्हा दूध उत्पादक कात्रज संचालक तसेच गावोगावच्या ग्रामपंचायती, पतसंस्था, सोसायटी यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणजे दिलीप मोहिते पाटील यांचे जवळपास ९५ टक्के वर्चस्व आहे. तालुका पातळीवरील कार्यकर्त्यांची फळी आणि विविध गावांतील शेकडो कार्यकर्ते असतानाही घटलेले मताधिक्य हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने चिंतेचा विषय झाला आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व इतर निवडणुकांमध्ये शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार बाबाजी काळे हे मोहिते पाटलांसाठी डोकेदुखी ठरू शकतात हे नक्की.
भाजप अध्यक्षांकडूनही फटका
भाजपचे जिल्हा अध्यक्ष आणि पिंपरी पाईट जिल्हा परिषद गटाचे सदस्य शरद बुट्टे पाटील हे महायुतीचे प्रचारक होते. बुट्टे पाटील यांच्या गटात मोहिते पाटील यांना फक्त ९,७७५ मते, तर बाबाजी काळे यांना २२,९६८ मतांची आघाडी मिळाली आहे. तालुक्यातील सातही जिल्हा परिषद गटांपैकी या गटात तब्बल १३,१९३ मतांची आघाडी काळे यांना मिळाली आहे. यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत बुट्टे पाटील यांना मोठी कसरत करावी लागणार आहे.
बालेकिल्ल्यातही पीछेहाट
रेटवडी-पिंपळगाव हा जिल्हा परिषद गट मोहिते पाटील यांचा बालेकिल्ला आणि अध्यक्ष पद या गटाला असूनही मोहिते यांची या गटात पीछेहाट झाली आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे यांच्या जिल्हा परिषद गटातही दिलीप मोहिते पाटील यांना १३,०६० मते मिळाली, तर बाबाजी काळे यांना १९,५८१ मते मिळवून ६,५२१ मतांची आघाडी घेण्यात यश मिळाले आहे.