पिंपरी : भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सदस्यपदासह नगरसेवक पदाचा आज राजीनामा दिला. त्यामुळे भाजपातील त्याचा प्रवेश निश्चित झाला असून, लवकरच ते अधिकृत प्रवेश करणार आहेत. आमदार लांडगे यांच्या पक्षांतराच्या निर्णयानंतर शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. आमदार लांडगे यांनी महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे नगरसेवक पदाचा राजीनामा गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सादर केला. गेल्या काही महिन्यांपासून ते भाजपात जाणार असल्याची शहरात चर्चा आहे. मात्र, राष्ट्रवादीच्या नगरसेवक पदाचा त्यांनी राजीनामा दिलेला नव्हता. त्यामुळे आमदार लांडगे यांची भूमिका काय राहील, याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. समर्थक कार्यकर्त्यांची तळ्यात मळ्यातअशी स्थिती निर्माण झाली होती. ही स्थिती त्यांच्या नगरसेवकपदाच्या राजीनामा देण्याच्या निर्णयाने संपुष्टात आली आहे.मुंबईत आज प्रवेश...नगरसेवक पदाचा राजीनामा दिल्याने लांडगे यांची भाजपा प्रवेशाची वाट मोकळी झाली आहे. मुंबईत प्रदेश भाजपाच्या कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी १४ आॅक्टोबरला त्यांचा अधिकृत प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे २७ नोव्हेंबरला पिंपरी दौ-यांवर येणार आहेत. त्यावेळी शहा यांच्या उपस्थितीत भोसरीत कार्यकर्ता मेळावा होणार असून, आमदार लांडगे यांच्यासह समर्थकांचा जाहीर सत्कार केला जाणार आहे.(प्रतिनिधी)
महेश लांडगे यांची ‘राष्ट्रवादी’ला सोडचिठ्ठी
By admin | Published: October 14, 2016 5:42 AM