पुणे : गुंतवणूकदारांची कोट्यावधीची फसवणूक केल्याप्रकरणात समृध्दी जीवन मल्टीपर्पज को-आॅपरेटीव्ह सोसायटी लि. चा प्रमुख महेश मोतेवार याचा मुलगा अभिषेक मोतेवार आणि भाची पुजा कामले यांचा अटकपूर्व जामीन विशेष न्यायालयाचे न्यायाधीश जे.टी.उत्पात यांनी फेटाळला.
महेश मोतेवार यांना अटक झाल्यानंतर त्यांचा मुलगा अभिषेक मोतेवार हा समृद्धी जीवन सोसायटीचे कामकाज पहात होता. तर पुजा कामले हिने सोसायटीचे अध्यक्षपद भूषविले आहे. मुख्य आरोपी महेश मोतेवार आणि त्याची पत्नी लीना या दोघांना या प्रकरणात अटक करण्यात आली असून, सध्या दोघे तुरूंगात आहेत. आणखी १७ जणांवर या प्रकरणात गुन्हा दाखल आहे.
याबाबतची माहिती अशी, समृद्धी जीवन मल्टीपर्पज सोसायटीत गुंतवणूकीवर आकर्षक परतावा देण्याच्या बहाण्याने हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणात अभिषेक आणि पुजा या दोघांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जास विशेष सरकारी वकील सुनील हांडे यांनी विरोध केला. त्यांनी न्यायालयात सांगितले की, पुजा या सुरूवातीला सोसायटीमध्ये नोकरीस होत्या़ त्यानंतर तिने सोसायटीचे संचालक, अध्यक्षपद भूषविले आहे. तर महेश मोतेवार यांना अटक झाल्यावर अभिषेक सोसायटीचे काम स्व:त हजर राहून पाहत होता. त्या दोघांनी तेथील रक्कमेची विल्हेवाट लावण्यासाठी सर्वतोपरी मदत केली आहे. महेश आणि त्याची पत्नी लीना या दोघांच्या बँक खात्यावरील ८५ लाख रुपये अभिषेक यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. ही रक्कमेचे त्याने काय केले, याचा तपास करणे आवश्यक आहे.
समृध्द जीवन फुड्स इंडिया लि. कंपनीला सेबीने गुंतवणूकदारांकडून रक्कम स्वीकारण्यास बंदी घातली. त्यावेळी २०१३ पासून सोसायटीमार्फत गुंतवणूकदारांकडून रक्कम स्वीकारण्यात आल्या आहेत. ठेवीची मुदत संपल्यानंतरही गुंतवणूकदारंचे पैसे परत दिले जात नाहीत. १७ राज्यातील ४३२ शाखांमधील सुमारे २१ लाख गुंतवणूकदारांची ३ हजार ७०० कोटी रुपयांचे सोसायटी देणे आहे. या रक्कमेचा अपहार झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. रक्कम कुठे आहे, याचा स्पष्ट खुलासा संचालक आणि पदाधिका-यांकडून देण्यात येत नाही. बेकायदेशीरपणे ही रक्कम अन्य काही ठिकाणी गुंतवणूक केल्याचे आढळून येत आहे.
सोसायटीवर नियुक्त केलेल्या लिक्विडेटर यांनी संचालक आणि इतरांनी मिळून २ हजार ५१२ कोटी रुपयांचा अपहार केल्याचे तक्रार पोलिसांकडे दिली आहे़ महेश यांची फरार असलेली पत्नी वैशाली हिचे कुलमुख्त्यार पत्र घेऊन अभिषेक याने ठाणे येथील जमीन हस्तांतरणाचा करारनामा करून तिºहाईत व्यक्तीचे हक्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. अटक करून दोघांची पोलीस कोठडीत तपास करणे आवश्यक असल्याने दोघांचा अटकपूर्व फेटाळावा, असा युक्तीवाद अॅड. हांडे यांनी केला. हा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने दोघांचा अटकपूर्व फेटाळला.