पुणे : गुंतवणूकदारांची समृद्ध जीवन मल्टिपर्पज को-आॅपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी महेश मोतेवार याची भावजय आणि मेहुण्याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनीअटक केली. त्या दोघांना ४ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष न्यायाधीश ए. एस. भैसारे यांनी दिला आहे.मेहुणा प्रसाद प्रकाश छिद्रावार (वय ३0, रा. बार्शी, जि. सोलापूर) आणि भावजय सुवर्णा रमेश मोतेवार (वय ४0, रा. आंबेगाव बुद्रुक) अशी पोलीस कोठडी देण्यात आलेल्यांची नावे आहेत. यापूर्वी महेश याची पत्नी लीना, मुलगा अभिषेकसह पाच जणांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. तर, महेश याच्यासह १८ जणांवर गुन्हा दाखल आहे. किरण दीक्षित (वय ५३, रा. दत्तवाडी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. प्रसाद हा पत्नी वैशालीचा मामेभाऊ आहे. सोसायटीच्या माध्यमातून लाखो गुंतवणूकदारांकडून ३ हजार ७00 कोटी रुपये जमा केले असून, त्यापैकी २ हजार ५00 कोटी रुपयांचा अपहार झाला आहे. दोघेही मुख्य आरोपी महेश याचे जवळचे नातेवाईक आहेत. ते लाभार्थी असण्याची शक्यता आहे. प्रसाद हा सोसायटीने गुंतवणूक केलेल्या हॉटेल आणि रिसॉर्टमधून येणारे उत्पन्न स्वत:कडे वळते करून घेतले आहे. याबाबत तपास करण्यासाठी दोघांना पोलीस कोठडी देण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील जावेद खान यांनी केली.
महेश मोतेवार यांच्या भावजय आणि मेहुण्याला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2019 1:12 AM