पिंपरी : पुणे, पिंपरी चिंचवड, चाकणसह विविध ठिकाणी महिंद्रा समूह ऑक्सिजन पुरविण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहे. त्यासाठी शंभर वाहने देण्यात येणार असून, त्यातील वीस वाहने पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी असतील, अशी घोषणा कंपनीने केली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. हॉस्पिटल आणि कोरोना केंद्रामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी महिंद्रा समूहाने ऑक्सिजन ऑन व्हील या उपक्रमाची घोषणा केली आहे. त्या अंतर्गत मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, चाकण, नाशिक आणि नागपूरमध्ये मोफत सेवा देण्याची घोषणा कंपनीने केली आहे. तसेच पुढील टप्प्यात रुग्णाच्या थेट घरी ऑक्सिजन सिलिंडर पोचविण्याचा विचार कंपनी करीत आहे. या प्रकल्पासाठी स्थानिक प्रधासन आणि सरकारी संघटनांशी करार केला आहे. वाहनांचा ताफा, सर्वसमावेशक आदेश, नियंत्रण केंद्र यांच्या मदतीने रुग्णालय आणि वैद्यकीय केंद्रांना ऑक्सिजनचा पुरवठा केला जाणार आहे.
ऑक्सिजनची पुरवठा साखळी तयार करण्यासाठी या उपक्रमाची मदत होईल. ऑक्सिजनची तातडीची गरज पूर्ण करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णांचा जीव वाचविता येईल. त्याच बरोबर रुग्णालयांवरील ताणही कमी होईल, असे महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनिश शहा यांनी सांगितले. कोरोना रुग्णांसाठी आयसीयू बेड उपलब्ध करणे, आपत्कालीन कॅब सेवा, विलगीकरण केंद्र उभारणे, वंचित घटकांना आर्थिक मदत आणि धान्य पुरवठा करणे, पीपीई किट, फेस मास्क आशा वस्तूंचे उत्पादनही करण्यात येत असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले.