Mahrashtra Election 2019 : चंद्रकांत पाटील यांना धक्का देण्यासाठी 'यूपी पॅटर्न'?; अजित पवारांचे 'मनसे' संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 01:43 PM2019-10-04T13:43:56+5:302019-10-04T13:44:24+5:30
कोथरुडच्या जागेसंदर्भात वेगळाच पॅटर्न राबवण्याचे संकेत अजित पवारांनी दिले आहेत.
पुणेः राष्ट्रवादीचे उमेदवार अजित पवारांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोथरुडच्या जागेसंदर्भात वेगळाच पॅटर्न राबवण्याचे संकेत अजित पवारांनी दिले आहेत. ते म्हणाले, कोथरूडच्या जागेच्या संदर्भात आम्ही सर्व विरोधी पक्षांनी मिळून एक उमेदवार द्यायचा ठरवला होता. त्यानुसार आम्ही राष्ट्रवादीतर्फे स्वप्नील दुधाने यांच्या नावाचा विचार केला होता. राजू शेट्टी यांनी विश्वंभर चौधरी यांचे नाव सुचवले होते.
राज ठाकरे यांच्याशी चर्चा करता त्यांनी किशोर शिंदे यांचे नाव सांगितले होते. तिथे लोकसभा निवडणुकीच्या वेळी गिरीश बापट यांना एक लाख मताधिक्य मिळाले होते, म्हणून तिथे एकच उमेदवार देण्याचा विरोधी पक्षांचा विचार होता. मात्र किशोर शिंदे यांना पाठिंबा देणार का, असं पत्रकारांनी विचारताच छाननी झाल्यावर भूमिका स्पष्ट करू, असं अजितदादांनी सांगितलं आहे.
राज्याच्या निवडणुकीत चंदक्रांतदादा पाटील उभे असलेल्या कोथरुड मतदारसंघावर सगळ्यांचंच लक्ष आहे. विरोधकांनीही चंद्रकांत पाटलांना घेरण्यासाठी व्यूहरचना आखली असून, सर्वपक्षीय मिळून मनसेच्या किशोर शिंदेंना पाठिंबा देण्याची शक्यता आहे. स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे राजू शेट्टी यांनी निवडणूक लढविण्याची विश्वंभर चौधरी यांना ऑफर दिली होती. कोथरुडमधून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे रिंगणात आहेत. परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कोथरुडमधून किशोर शिंदे यांना उमेदवारी जाहीर केल्याने तसेच आपने देखील डॉ. अभिजीत मोरे यांना उभे केल्याने मतांचे विभाजन टाळण्यासाठी चौधरी यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याची आता चर्चा आहे.