पुणे : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ राज ठाकरे आज पुण्यातून करणार आहेत. पुण्यातील नातू बागेतील मैदानावर संध्याकाळी 6 वाजता ठाकरे यांची सभा आयाेजित करण्यात आली आहे. परंतु शहरात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे मैदानावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे सभेच्या वेळेपर्यंत मैदान पुर्ववत हाेणार का याची चिंता मनसे कार्यकर्त्यांना सतावत आहे.
यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत मनसेने पुण्यातून आपले उमेदवार जाहीर केले आहेत. काेथरुडमधून किशाेर शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर कसब्यातून मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे निवडणुक लढवत आहेत. 9 ऑक्टाेबरला राज ठाकरे यांची पुण्यात सभा हाेणार असल्याचे मनसेकडून जाहीर करण्यात आले हाेते. त्यासाठी मैदानाची शाेधशाेध सुरु हाेती. पुण्याच्या मध्यवर्ती भागातील मैदान सभेसाठी हवे हाेते. शहरातील अनेक शैक्षणिक संस्थांनी मनसेला मैदान देण्यास नकार दिल्याने मैदान मिळवणे मनसेच्या कार्यकर्त्यांना अवघड झाले हाेते. त्यामुळे मनसेने अलका चाैकात सभा घेऊ देण्याची विनंती पाेलीस आयुक्तांना केली हाेती. अखेर नातू बागेतील मैदान मनसेला सभेसाठी मिळाले.
परंतु गेल्या काही दिवसांपासून शहरात पाऊस पडत असल्याने मैदानावर पाणी जमून चिखल तयार झाला आहे. काल रात्री देखील शहरात मुसळधार पाऊस झाल्याने मैदानावर चारही बाजूंना चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांकडून हा चिखल काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर हे सुद्धा मैदानाची पाहणी करण्यास गेले आहेत. काहीही झाले तरी आज संध्याकाळी राज ठाकरेंची सभा हाेणार असा विश्वास मनसेच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.