गणेश बिडकर : ‘ऑफलाईन‘ होणार जून महिन्याची सर्वसाधारण सभा
पुणे : पालिकेची जून महिन्यात होणारी सर्वसाधारण सभा एकाच वेळी दोन सभागृहात होणार आहे. नगरसेवकांना निम्म्यानिम्म्या संख्येने नव्या आणि जुन्या सभागृहात बसविले जाणार आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्थात नगरसेवकांच्या प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये होणारी ही सभा पहिल्यांदाच अशा प्रकारे पार पडणार आहे. यापुढील काळात दोन सभागृहात विभागूनच ही सभा घेतली जाणार असल्याची माहिती पालिकेतील सभागृह नेते गणेश बिडकर यांनी दिली.
कोरोनामुळे राज्य शासनाच्या आदेशानुसार पालिकेच्या सर्वसाधारण सभा ऑनलाईन घेण्यात येत आहेत. या सभांमध्ये तांत्रिक अडथळे निर्माण होत असल्याने सभासदांनी नाराजी व्यक्त केली होती. सत्ताधारी भाजपासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसेच्या सभासदांनी सभा प्रत्यक्ष चालवावी अशी मागणी केली होती.
इंटरनेट कनेक्टिव्हिटी गायब होत असल्याने सभासदांना आपले मत, भूमिका मांडताना अडथळे येत होते. राज्य सरकारने निर्बंध उठविण्यास सुरुवात केल्यानंतर प्रत्येक महिन्यात घेतली जाणारी सर्वसाधारण सभा ऑफलाइन पद्धतीने घेण्याची परवानगी द्यावी अशी मागणी पालिकेतील सर्वपक्षीय गटनेत्यांनी केली होती. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना निवेदन देखील देण्यात आले होते. त्यावेळी पवार यांनी नगर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना सर्वसाधारण सभा घेण्याबाबत अशी परवानगी द्यावी अशा सूचना केल्या होत्या.
त्यानुसार गेल्या आठवड्यात पालिकेला ही परवानगी देण्यात आली आहे. सभागृहात एकूण सभासदांच्या ५० टक्के उपस्थितीमध्ये ही सभा घेण्यास तसेच कोरोनाबाबतच्या आवश्यक त्या नियमांचे पालन करून सर्वसाधारण सभा घेण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार पक्ष नेत्यांच्या बैठकीत यावर सविस्तर चर्चा करून यापुढील काळात ऑफलाईन पद्धतीने सभा घेण्याच्या सूचना करण्यात आल्याचे सभागृह नेते बिडकर यांनी सांगितले.