पुणो : शहरात तीन महिन्यांपासून धुडगूस घातलेल्या डेंग्यूच्या साथीने महापालिकेची मुख्य सभाही गुरुवारी चांगलीच तापली. डेंग्यूमुळे पुणोकरांसाठी आरोग्याची आणीबाणी निर्माण झाली असल्याने प्रशासनाने सुस्त न बसता, तत्काळ साथ आटोक्यात आणण्याची मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली.
प्रशासनाच्या उपाययोजनांमुळे रुग्णांची संख्या कमी झाल्याचा दावा अधिका:यांनी केला. डेंग्यूमुळे पुणोकर तापाने फणफणत आहेत. त्याचे पडसाद महापालिकेच्या मुख्य सभेतही उमटले. नगरसेवक बाबू वागसकर यांनी 15 पुणोकरांमागे एक डेंग्यूचा रुग्ण असल्याची माहिती सभागृहात दिली. आरोग्य विभागाने तत्काळ औषध फवारणी करण्याची मागणी त्यांनी केली. तर शहरातील काही डॉक्टर डेंग्यूच्या नावाखाली पुणोकरांना वेठीस धरत असून, आर्थिक लूट सुरू असल्याचे सभागृह नेते सुभाष जगताप, नगरसेवक किशोर शिंदे , संजय बालगुडे, बाळा शेडगे यांनी सांगितले. आरोग्य विभागाने घरोघरी जाऊन जनजागृती करावी, अशी मागणी माजी महापौर चंचला कोद्रे यांनी केली. (प्रतिनिधी)