पुणे : महापालिकेच्या निवडणुकीसाठी केवळ ‘इलेक्टिव्ह मेरिट’चा विचार करून जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. प्रमुख राजकीय पक्षांची मदार बहुतांशी ‘गुन्हे’ दाखल असलेल्या उमेदवारांवरच आहे. खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी, अपहरण, फसवणूक, विनयभंगासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेले उमेदवार राजकारणाची आघाडी सांभाळत असल्याचे चित्र आहे, तर काही ठिकाणी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या कार्यकर्त्यांनी पत्नी अथवा नातेवाईकांना उमेदवाऱ्या मिळवल्या आहेत. पुणे शहर पोलिसांनी शहरात निवडणुकीतील गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांची यादी तयार केली आहे. पक्षनिहाय तयार करण्यात आलेल्या या यादीमध्ये सर्वाधिक उमेदवार भारतीय जनता पक्षाचे आहेत, तर त्याखालोखाल शिवसेना आहे. तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असून चौथ्या क्रमांकावर काँग्रेससह मनसे व बहुजन समाज पार्टी आहे, तर अपक्षांमध्ये गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांची संख्या तब्बल २४ आहे. त्यामध्ये काही पक्षांतर केलेल्या अपक्षांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाच्या प्रतिज्ञापत्रातच उमेदवारांना दाखल गुन्ह्यांचा उल्लेख करावा लागतो. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी तर उमेदवारांवरील गुन्ह्यांचा लेखाजोखाच मतदान कक्षाबाहेर लावण्यात येणार आहे.
प्रमुख पक्षांची मदार ‘गुन्हेगार’ उमेदवारांवर
By admin | Published: February 16, 2017 3:30 AM