पुणे : विधीसंघर्षग्रस्त मुलांचा गुन्हेगारीतील वाढता सहभाग रोखून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न शहर पोलीस दलाकडून करण्यात येत आहे़. त्याचाच एक भाग म्हणून त्यांचे शिक्षण व स्वयंरोजगारात मदत करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला आहे़. पुणे शहरात सुमारे १६०० विधीसंघर्षग्रस्त मुले असून त्यांना पोलीस ठाण्याच्या पातळीवर मार्गदर्शन देण्यास सुरुवात करण्यात आली आहे़. त्यात मुलांबरोबर पालकही सहभागी होतात़ पोलीस ठाण्यातून बोलावणे आल्यावर प्रथम मुलांना संशय येतो़. मात्र, इथे आल्यावर आपल्याला गुन्ह्यासाठी बोलावले नसून त्यातून आपल्याला बाहेर काढण्यासाठी मदतीचा हात देण्यासाठी बोलाविण्यात आल्याचे लक्षात आल्यावर त्यांचा पोलिसांवरील विश्वास वाढू लागला आहे़. लाईफ स्कुल फाऊंडेशनच्या वतीने या मुलांना मार्गदर्शन करण्यात येत आहे़. या प्रकल्पात तीन टप्प्यात मार्गदर्शन व सल्ला दिला जाणार आहे़. पहिल्या टप्प्यात पोलीस ठाण्याच्या पातळीवर सर्वांमध्ये आपण या गुन्हेगारी क्षेत्रातून बाहेर पडू शकतो, असा विश्वास निर्माण करण्यात येत आहे़. त्यानंतर त्यांच्या शिक्षण व रोजगाराविषयीच्या अडचणींमधून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे़. याबाबत लाईफ स्कुल फाऊंडेशनचे संस्थापक नरेंद्र गोईदानी यांनी सांगितले की, लिडरशिप ट्रेनिंगमध्ये लाईफ स्कुल गेली २० वर्षे काम करीत आहे़. या वर्षी भरोसा सेलच्या माध्यमातून पोलीस आयुक्त डॉ़. के. व्यंकटेशम यांच्याशी चर्चा करताना विधीसंघर्षग्रस्त मुलांना गुन्हेगारीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्याच्या योजनेबाबत चर्चा झाली़. या मुलांना पोलीस ठाण्याच्या पातळीवर स्वयंसेवकांमार्फत मार्गदर्शन करुन त्यांच्यात विश्वास निर्माण करण्याचे काम लाईफ स्कुल फाऊंडेशनने आपल्याकडे घेतले आहे़. संस्थेचे स्वंयसेवक पहिल्या टप्प्यात आपणही आपल्या इच्छेनुसार चांगली व्यक्ती बनू शकतो, हा विश्वास निर्माण करण्यात येणार आहे़. त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात आतापर्यंत दोन बैठका झाल्या आहेत़. दुसऱ्या टप्प्यात या मुलांशी वैयक्तिक पातळीवर सर्व्हे करुन त्यांच्यात कोणते सुप्त गुण आहेत़. त्यांची आवडी निवडी काय आहेत़ त्यांना काय व्हायचे आहे, हे जाणून घेऊन त्यांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे़. त्यासाठीचा सर्व शैक्षणिक खर्च संस्था उचलणार आहे़. त्यांच्या आवडीनुसार त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे़. तिसऱ्या टप्प्यात या मुलांना प्रत्यक्ष स्वयंरोजगार अथवा नोकरीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहे़. त्यासाठी एसव्हीपी या स्वयंसेवी संस्थेची मदत घेण्यात येत आहे़.
विधीसंघर्षग्रस्त मुलांना आणणार मुख्य प्रवाहात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 11:13 AM
पुणे शहरात सुमारे १६०० विधीसंघर्षग्रस्त मुले आहे़...
ठळक मुद्देशिक्षण व स्वयंरोजगारासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत मुलांना प्रत्यक्ष स्वयंरोजगार अथवा नोकरीसाठी प्रयत्न करण्यात येणार