शिरूर - ३१ डिसेंबरच्या रात्री सर्वत्रच रंगीत पार्ट्यांमध्ये असंख्य तरुण रमलेले असताना येथील, तसेच जिल्ह्यातील काही तरुण मात्र नाशिक जिल्ह्यातील किल्ले हरिहरचे पावित्र्य राखण्याच्या मोहिमेत दंग झालेले दिसून आले. ३१ डिसेंबर ते १ जानेवारी अशी ही मोहीम रंगली. नववर्षाची यापेक्षा चांगली सुरुवात ती कुठली असेच म्हणावे लागेल.३१ डिसेंबरची रात्र म्हणजे जल्लोषाची रात्र मानली जाते. रात्रभर विविध प्रकारे ही रात्र साजरी केली जाते. आजकालची तरुणाई तर या रात्री बहुतांशी मदहोश असल्याचे आढळून येते. या वेळची ३१ डिसेंबर (२०१७) ची रात्रही त्याला अपवाद नव्हती. अनेक जण गडकिल्ल्यांवरही ३१ डिसेंबरची रात्र साजरी करताना दिसतात.छत्रपती शिवाजीमहाराजांचा एक विचारच असलेल्या या गडकिल्ल्यांवर ३१ डिसेंबरच्या रात्रीची नको ती छाप पाडली जाते. या गडकिल्ल्यांवर ओल्या पार्ट्या रंगताना दिसतात, ही बाब म्हणजे छत्रपतींच्या विचारांना तडा देणारी बाब म्हणावी लागेल. हे चित्र बदलण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठानच्या तरुणांनी ३१ डिसेंबरला नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील किल्ले हरिहरगडावर गडकोट पावित्र्य मोहिमेचे आयोजन केले.शिवरायांची ज्या गडकिल्ल्यांच्या जोरावर स्वराज्य स्थापन केले. त्या गडकिल्ल्यांचा वापर ३१ डिसेंबरच्या रात्री नको त्या कारणांसाठी होऊ नये, म्हणून सह्याद्री प्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष कुणाल काळे, गणेश खुटवड, संदीप पवार, गुरुदत्त नवघणे, स्वप्निल राजवाडे, मयूर मोयनाक, उमेश भावले या शिवप्रेमींनी किल्ले हरिहरच्या पायथ्याशी पर्यटकांची व त्यांच्या बॅगांची तपासणी केली.शिवप्रेमींचा जागता पहाराया आक्षेपार्ह गोष्टी आढळल्या. त्या पायथ्याशीच नष्ट करण्यात आल्या. या पद्धतीने त्यांनी गडाचे पावित्र्य राखल्याचे स्तुत्य काम केले. १ जानेवारीला काही तरुण जातिभेदाच्या नावाखाली रस्त्यावर लढत असताना हे शिवप्रेमी त्यादिवशीही किल्ले हरिहरवर आपले कर्तव्य पार पाडत होते. ३१ डिसेंबर ते १ जानेवारी या शिवप्रेमींनी जागता पहारा ठेवला. दरवर्षी तरुणांनी राज्यातील प्रत्येक किल्ल्यांवर अशा प्रकारची मोहीम राबवून गडकिल्ल्यांचे पावित्र्य राखण्याचे काम करावे, असे आवाहन कुणाल काळे यांनी केले.
‘हरिहरेश्वरा’चे पावित्र्य राखत त्यांनी केली नववर्षाची सुरुवात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 2:42 AM