पुणे : जगातील चौथी मोठी हवाईदल असलेल्या भारतीय हवाईदलातील सर्व विमानांचे आणि इतर उपकरणांची देखभाल व दुरुस्ती डिसेंबर २०१७ पर्यंत इलेक्ट्रॉनिक-आॅनलाईन पद्धतीने केली जाणार आहे. त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित इलेक्ट्रॉनिक मेंटेनन्स मॅनेजमेंट सिस्टिम (ईएमएमएस) ही प्रणाली तयार करण्यात आली आहे. ही प्रणाली प्रायोगिक तत्त्वावर पुण्यातील लोहगाव विमानतळावर बसविण्यात आली आणि यशस्वीरीत्या सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता टप्प्याटप्प्याने ती हवाईदलाच्या सर्व तळांवर, विभागांमध्ये कार्यान्वित करण्यात येईल, अशी माहिती वायुसेनेच्या एअर स्टाफचे प्रमुख एअर चीफ मार्शल अरुप राहा यांनी दिली.लोहगाव विमानतळातील सुखोई या लढाऊ विमानांसाठी बसविण्यात आलेल्या हवाईदलातील पहिल्या ईएमएमएस प्रणालीचे उद्घाटन राहा यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी हवाईदलाचे साऊथ वेस्टर्न कमांडचे प्रमुख एअर मार्शल आर. के. धीर, हवाईदलाचे देखभाल दुरुस्ती विभागाचे प्रमुख एअर मार्शल पी. पी. खांडेकर, विप्रो कंपनीचे उपाध्यक्ष टी. के. कुरियन आदी उपस्थित होते.राहा म्हणाले, ‘‘लढाऊ विमानांची, त्यांच्यासाठी वापरण्यात येणाऱ्या क्षेपणास्त्रांची देखभाल व दुरुस्ती हे एक महत्त्वाचे काम आहे. आतापर्यंत या सर्वांच्या नोंदी आणि माहिती कागदोपत्री ठेवण्यात येत होत्या. मात्र, आत्या त्या आॅनलाईन पद्धतीने करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोणत्या विमानाची, क्षेपणास्त्राची दुरुस्ती, देखभाल आवश्यक आहे, ती कोणत्या पद्धतीने करण्यात येत आहे, त्याची माहिती देशभरात हवाईदलाच्या अधिकाऱ्यांना कोठेही व कधीही मिळू शकेल. त्याचबरोबर या तंत्रज्ञानामुळे मानवी कष्ट आणि कामाचे तासही वाचणार आहेत.’’खांडेकर म्हणाले, ‘‘हवाईदलात देखभाल-दुरुस्तीसाठी अशाप्रकारची आॅनलाईन सिस्टिम पहिल्यांदाच आणली जात आहे. लष्कर आणि नौदलामध्ये अजून अशी सिस्टिम नाही. ती पहिल्यांदाच हवाईदलात आणली जात आहे. भविष्यात यातून जमा झालेल्या माहितीच्या आधारे नॉलेज बँक तयार करण्यात येईल.’’
क्षेपणास्त्रांची देखभाल इलेक्ट्रॉनिक होणार
By admin | Published: May 13, 2016 1:34 AM