लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सरकारने पुणे जिल्ह्यातील इंदापूर आणि बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांकडून एमएसपी दराने मका खरेदी केली आहे. यामुळेच या मक्याचे वाटप जिल्ह्यातील रेशनकार्डधारकांना करण्यात येणार असून, मार्च महिन्यात तब्बल २४ लाख लाभार्थ्यांना एक रुपया किलो दराने हे वाटप करण्यात येणार आहे.
सरकारने जाहीर केल्याप्रमाणे पुणे जिल्ह्यातील इंदापूर आणि बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांकडून १८ रुपये किलो या हमीभावानुसार मका खरेदी केली. पुण्यासह राज्यातील अनेक तालुक्यांतील शेतकऱ्यांकडून मका आणि ज्वारी खरेदी केली. आता ही मका आणि ज्वारी शासनाकडून रेशनकार्डवर लोकांना वाटप करण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर आणि बारामती तालुक्यातून ५१४.९५ मे.टन मका खरेदी करण्यात आली आहे. शासनाच्या आदेशानुसार प्राधान्यक्रम कुटुंबांना याचे वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्राधान्यक्रम कुटुंब शिधापत्रिकांची संख्या ५ लाख ३४ हजार असून, लाभार्थी संख्या तब्बल २४ लाख ९८ हजारांच्या घरात आहे. या सर्व लाभार्थ्यांना प्रत्येकी एक किलो मका वाटप करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मका लागणार असल्याने जळगाव जिल्ह्यातून १३ शे मे.टन असे एकूण १८१६ मे.टन मक्याचे वाटप करण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यात केवळ मक्याचे वाटप करण्यात येणार असून, ज्वारी देण्यात येणार नाही.
---------
मार्च महिन्यात एक किलो गहू कमी करून मका मिळणार
शासनाच्या वतीने दर महिन्याला ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ वाटप केले जाते. मार्च महिन्यात ३ किलो गहू ऐवजी २ किलो गहू आणि एक किलो मका व २ किलो तांदूळ वाटप करण्यात येणार आहे.
------
जिल्ह्यातील एकूण शिधापत्रिका - 8 लाख 93 हजार
प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका - 5 लाख 34 हजार
अंत्योदय शिधापत्रिका - 48 हजार 744
--------
एक रुपया किलो मका
शासनाने 18 रुपये किलो दराने मका खरेदी केली असून, रेशनिंवर एक रुपये दराने नागरिकांना देण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यात केवळ प्राधान्यक्रम कुटुंब रेशनकार्ड धारकांनाच ही एक किलो मका देण्यात येणार कुटुंबात जेवढे सदस्य त्या प्रमाणात हे धान्य मिळणार आहे. पुणे जिल्ह्यातील 24 लाख 98 हजार लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे.
-------
जिल्ह्यात केवळ एका महिन्यांसाठी मका वाटप
पुणे जिल्ह्यातील शेतक-यांकडून हमी भावाने मका खरेदी करण्यात आली आहे. यामुळेच जिल्ह्यात केवळ मक्याचे वाटप करण्यात येणार असून, ज्वारीचे वाटप होणार नाही. जिल्ह्यातील मार्च महिन्यात मका वाटप करण्यात येणार असून, केवळ एक महिन्यांसाठी हे वाटप होणार आहे. त्यानंतर नियमित वाटप होईल.
साहेबराव गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी
---------
मका घेऊन काय करणार
पुणे जिल्ह्यात मका केवळ जनावरांनाच खायला दिला जातो. पुणे जिल्ह्यात मक्याच्या भाकरी खाण्याची परंपरा नाही. यामुळेच शासनाकडून देण्यात येणा-या मक्याचे नक्की काय करायचे हा प्रश्नच आहे.
- एक लाभार्थी