धायरी: नवले पुल परिसरातील अपघातांचे सत्र काही केल्या थांबायला तयार नाही. नऱ्हे येथील सेवा रस्त्यावरील भूमकर पुल चौकात ब्रेक फेल झालेल्या कंटेनरने एकूण चार वाहनांना धडक दिल्याने दोन जण जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास घडली. कंटेनरचालक पंकज महापात्रे (वय:५७, रा. उमरगा, जिल्हा उस्मानाबाद) याला सिंहगड रस्ता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेली माहिती अशी की, शिरवळवरून फ्रिज व इतर साहित्य घेऊन निघालेला कंटेनर नऱ्हे येथील भूमकर पुलाजवळ सेवा रस्त्यावर आला असता कंटेनरचे ब्रेक झाले. दरम्यान चौकात असणारे वाहतूक कर्मचारी माधव गोपनर, महेंद्र राऊत, सुशांत यादव या कर्मचाऱ्यांच्या लक्षात ही बाब आल्याने त्यांनी त्वरित इतर रस्त्याने येणारी वाहतूक थांबविल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र कंटेनर समोर असणाऱ्या दोन चारचाकी, एक तीनचाकी रिक्षा व एका दुचाकीला कंटेनरची धडक बसली. यामध्ये दोन जण जखमी झाले.
घटनेनंतर नागरिकांनी कंटेनर चालकाला बेदम मारहाण केली. पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतले असून इतर वाहनामधील जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, घटनेनंतर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. मात्र सिंहगड रस्ता वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग वाघमारे व पोलीस कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली.
ऐन गर्दीच्या वेळी ब्रेक फेल...नऱ्हे येथील भूमकर पुल चौकात दररोज सकाळी व सायंकाळी मोठी गर्दी असते. ऐन गर्दीच्या वेळी कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने एकच हाहाकार उडाला. या अपघातातील एका क्रेटा वाहनाला कंटेनरने पाठीमागून जोराची धडक दिल्याने क्रेटा हवेत चेंडूसारखी उडाली. काही क्षणाकरिता तिथे असलेल्या नागरिकांना काय झाले हेच समजेना. तिथे असलेले वाहतूक कर्मचारी माधव गोपनर यांच्या जवळून कंटेनर गेला. ते थोडे जरी मागे - पुढे थांबले असते तर मोठा अनर्थ टळला.