लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील नागझरीलगत असलेल्या नाना पेठेतील हॉलमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर शनिवारी परिमंडळ १ च्या पोलीस आयुक्त प्रियांका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने छापा घातला. यावेळी दोघा चालकांसह २६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून ५८ हजार ५०० रुपयांची रोकड, १४ मोबाईल असा २ लाख १८ हजार ६८० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
पोलिसांनी जुगार अड्डा चालविणार्या सोमनाथ सयाजी गायकवाड (वय ३६, रा. नाना पेठ) व अशोकसिंग अंबिका सिंग (वय ३६, रा. गोपी चाळ, दापोडी) यांच्यासह २६ जणांविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर परिमंडळ एक च्या पोलीस उपायुक्त प्रियांका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखालील पोलीस पथकाने शनिवारी सायंकाळी नाना पेठेतील हॉलमध्ये छापा घातला. त्यात तब्बल २४ जण जुगार घेताना दिसून आले. त्यात अगदी २० वर्षाच्या युवकापासून ६४ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग दिसून आला आहे. या सर्वांना अटक केली आहे.
या प्रकरणी पोलीस उपायुक्त कार्यालयात प्रतिनियुक्तीवर असलेले हवालदार संतोष थोरात यांनी समर्थ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. डेक्कन पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक व उपायुक्त कार्यालयात प्रतिनियुक्तीवर असलेले उपनिरीक्षक पी. एच काळे यांनी या कारवाईचा अहवाल सादर केला आहे.