पुणे: सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे जोरदारपणे स्वागत करताना पुणे, मुंबई, गोवा, नाशिक अशा विविध ठिकाणी रेव्ह पार्ट्यांचे आयोजन करण्यात येते. या पार्ट्यांमध्ये अंमली पदार्थांचे सेवन केले जाते. त्यामुळे अशा अंमली पदार्थांच्या खरेदी विक्रीत मोठी वाढ होते तसेच कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. त्याच धर्तीवर दिल्लीहून रेल्वेमधून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात चरसचा साठा आणण्यात येत होता. मात्र त्याचवेळी लोहमार्ग पोलिसांनी मोठी कारवाई १ कोटी ३ लाख रुपयांचा चरस जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.
याप्रकरणी हिमाचल प्रदेशातील दोन जणांना अटक करण्यात आली आहे. ललितकुमार दयानंद शर्मा (वय ४९) आणि कौलसिंग रूपसिंग (वय ४०) ही आरोपींची नावे आहेत.
पोलीस अधीक्षक सदानंद पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, नववर्षाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीहून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात चरसची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती आम्हाला मिळाली होती. मुंबई, पुणे, गोवा आणि बेंगळुरू येथे या चरसची विक्री होणार होती. मात्र आम्ही मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई करता तात्काळ पथके तयार केली होती. व पथकांच्या साहाय्याने विक्रीसाठी आणलेला चरस ताब्यात घेताना हिमाचल प्रदेशातील दोन जणांना अटक केली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजार पेठेतील किमतीनुसार साधारणपणे १ कोटी ३ लाख रुपयांचा चरस जप्त केला आहे.
पोलिसांनी या कारवाईच्या माध्यमातून नववर्षाच्या पार्श्वभूमीवर रेव्ह पार्ट्यांचे आयोजन व अमली पदार्थांचा पुरवठा आणि विक्री करणाऱ्यांना कडक इशारा दिला आहे.