लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे शहर पोलिसांनी रविवारी रात्री आयपीएलवर सट्टा खेळणाऱ्या दोन ठिकाणी एकाच वेळी मोठी कारवाई करत दोन आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट बुकींसह अनेकांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल ९३ लाख रुपयांवर अधिकची रोकड जप्त केली आहे. या कारवाई दरम्यान, सट्टाकिंग गणेश भुतडा आणि अशोक जैन या दोघांसह काही जणांना ताब्यात घेतले आहे. समर्थ व मार्केटयार्ड पाेलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंगळवार पेठेतील एका ठिकाणी छापा टाकून टाकून गणेश भुतडा याला अटक करून तेथून ९२ लाख ६५ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. तर मार्केट यार्ड येथून अशोक जैन या बुकीला अटक करण्यात आली असून तेथून ५१ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून अजूनही रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरू होती.
गणेश भुतडा हा देशातील मोठा क्रिकेट बुकी असून अशोक जैन हा ही मोठा बुकी आहे. आयपीएलमध्ये रविवारी दोन्ही मोठे सामने होते. त्यामुळे यावर मोठ्या प्रमाणावर सट्टा लावला जात असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना मिळाली होती. त्यांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधिकाऱ्यांना दिले.
त्यानुसार, सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, गुन्हे शाखेच्या प्रभारी अपर पोलीस आयुक्त भाग्यश्री नवटके, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, प्रियंका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाने तसेच गुन्हे शाखेच्या पथकांनी एकाच वेळी ही कारवाई केली.
गणेश भुतडा आणि अशोक जैन यांच्याकडील डायऱ्या, मोबाइल आणि इतर काही कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. त्यात या सट्ट्याच्या व्यवहाराची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.