पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तत्काळ २०० कोटी लसींची ऑर्डर देणे आवश्यक आहे. जेणेकरून लस कमी दरात उपलब्ध होईल. हे आधी केले असते तर कमी किमतीत लस मिळाली असती. केंद्राचे लसीकरणाचे धोरण चुकले आहे. राज्यांपासून शहारांपर्यंत वेगवेगळ्या ऑर्डर दिल्या जात आहेत. लसीकरणाच्या एकूणच नियोजनात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली.
मोदीसरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस भवनमध्ये आयोजिलेल्या पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते. या वेळी शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार मोहन जोशी, अभय छाजेड, माजी महापौर कमल व्यवहारे, रोहित टिळक, नगरसेवक अविनाश बागवे, रवींद्र धंगेकर, लता राजगुरू आदी उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले की, शहिदांच्या नावे मते मागून सत्तेत आलेल्या मोदी सरकारने विखारी राष्ट्रवाद, अल्पसंख्याकांचा द्वेष पोसला आहे. लोकशाहीचे दमन केले असून कोरोनाकाळात नियोजनशून्य कारभार, अहंकार आणि आत्ममग्नता यामुळे देशाची अवस्था वाईट झाली आहे.
नोटाबंदीचा निर्णय आणि जीएसटीची ढिसाळ अंमलबजावणी यामुळे अर्थव्यवस्थेला घरघर लागली आहे. त्यामुळे कोरोनापूर्वी २०१९-२० च्या शेवटच्या तिमाहीमध्ये आर्थिक विकास दर हा नीचांकी ४.२ टक्के होता. आत्मनिर्भरतेचा नारा दिलेल्या सरकारने वास्तवात सरकारी कंपन्या, विमानतळ, बंदरे, रेल्वेचे काही भाग मातीमोल भावाने विकून कर्ज भागविले.
कोरोनामुळे उत्पन्न कमी झाले असून खर्च वाढला आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी डिझेल, पेट्रोलदर वाढविण्यात येत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती कमी होत असतानाही दर वाढविले जात असून जनतेला खोटे सांगितले जाते. या सरकारला परराष्ट्र धोरणात मोठ्या प्रमाणावर अपयश आले आहे. चीनसोबतचे संबंध बिघडले असून नेपाळ, श्रीलंका हे देशही चीनच्या जवळ गेले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचारात सहभाग घेऊन मोदींनी चूक केल्याचे चव्हाण म्हणाले.
सत्तेत आलेल्या भाजपाने दुर्लक्ष केल्याने दुखावलेले शिवसेना, अकाली दल असे पक्ष त्यांच्यापासून दुरावले. कोट्यवधी शेतकऱ्यांचे जीवन काळ्या कृषी कायद्यांमुळे उद्ध्वस्त झाले. मोठ्या उद्योगपतींचा फायदा पाहिला गेला.
----
गेल्या वर्षीच्या विकास दराचे आकडे जाहीर व्हायला पाहिजे होते. ते अद्याप जाहीर झालेले नाहीत. पाच कोटी नोटा छापून खर्च करण्याचा सल्ला दिला होता. त्याला हेलिकॉप्टर मनी असे म्हणतात. ही सूचना ऐकली नाही.
----
लसीकरण संशोधनावर खर्च केला नाही. एक लाख टन ऑक्सिजन आयात करणारा असल्याचा खोटा आत्मविश्वास नडला. ऑक्सिजन शिवाय माणसे तडफडून मेली. देशात भीषण परिस्थिती असताना मागील पाच महिन्यांत नऊ हजार मेट्रिक टन ऑक्सिजन परदेशी पाठवल्याचे चव्हाण म्हणाले.
----
मोदी महल नंतर बांधा
सेंट्रल व्हिस्टा अव्हेन्यूच्या पुनर्बांधकामावर २० हजार कोटी खर्च करण्यापेक्षा या कामाला तात्पुरती स्थगिती द्यावी. मोदी महाल नंतर बांधता येईल. हा खर्च कोरोनावर करा असेही त्यांनी नमूद केले.